बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2019 च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या आमदारांचा शपथविधी बुधवारी राज्याच्या विधानसभेत पार पडला. या शपथविधीसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनात खडसे देखील आले होते. विधीमंडळाच्या प्रांगणात त्यांनी पाय ठेवताच माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना गराडा घातला. या पत्रकारांच्या अपेक्षेप्रमाणे एकनाथ खडसे यांच्या संतापाचा स्फोट झाला. ‘पक्ष कधी चुकत नसतो, पक्षाकडे नेते असतात किंवा ज्यांच्याकडे जबाबदारी दिलेली असते त्यांचे निर्णय चुकत असतात.’ अशा शब्दात खडसे यांनी महायुतीला बहुमत मिळूनही सत्ता स्थापन झाली नाही, नेमकं काय चुकलं या प्रश्नाचे उत्तर दिले.

2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप वेगवेगळी लढली होती. भाजप स्वबळावर लढणार असल्याची घोषणा एकनाथ खडसे यांनीच केली होती. याबाबत बोलत असताना खडसे म्हणाले की मी जरी घोषणा केली होती, तरी तो निर्णय माझा नव्हता. भाजपने दिल्लीत आणि राज्यात सामूहिक निर्णय केला होता की भाजपने स्वबळावर निवडणुका लढवल्या पाहिजेत. विरोधी पक्षनेता असल्यामुळे हा निर्णय मी जाहीर केला होता असं खडसे म्हणाले. 2019 च्या निवडणुकीत खडसेंचे तिकीट कापून त्यांच्या मुलीला म्हणजेच रोहिणी खडसे यांना तिकीट यांना देण्यात आले होते, मात्र त्यांचा पराभव झाला. या पराभवाचं शल्य खडसे यांना अजूनही बोचत असल्याचं स्पष्टपणे दिसून आलं. ‘वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आलं असं जनमानसात चित्र आहे. सर्वांनी एकत्र काम केलं तर पक्षाला बळ मिळतं. मात्र वर्षानुवर्ष काम करणाऱ्यांना तिकीट दिलं नाही. नवीन लोकांना तिकीट दिलं त्याचाही अप्रत्यक्षरितीने जनमानसावर झाला.’ अशा शब्दात खडसे यांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या मेगाभरतीवर आणि त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत प्रतिक्रिया दिली.

एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बानवकुळे, प्रकाश महेता यांना तिकीट नाकारलं, मात्र त्यांना निवडणुकीत सक्रिय केलं असतं तर राज्यात 5-25 जागा वाढल्या असत्या असं खडसेंनी म्हटलं आहे. ‘भाजपसाठी मी 40 वर्ष तपश्चर्या, मेहनत केली आहे. असं असताना हेतुपुरस्सर मला वेगळं ठेवण्याचं प्रयोजन काय? हा मी प्रश्न सातत्याने विचारला आहे असं खडसे म्हणाले. पक्षाच्या विस्तारासाठी ज्यांनी-ज्यांनी मदत केली त्यांना बाजूला ठेवल्याचा परिणाम निवडणुकीवर झाल्याचा दिसतोय’, असे खडसे म्हणाले.

भाजप ही सातत्याने भ्रष्टाचाराविरोधात लढत आली आहे अशी प्रतिमा होती. अजित पवार यांना सोबत घेतल्याने या प्रतिमेला धक्का बसला असं खडसे म्हणाले. ज्यांच्यावर आरोप केले त्यांच्यासोबत जाण्याची गरज नव्हती, असं माझ्यासह सगळ्यांचं मत होतं, असंही खडसेंनी स्पष्टपणे सांगितलं. ‘भ्रष्टाचाराचे ट्रकभर पुरावे दिले त्याचे काय?’ असा प्रश्न विचारला असता खडसे यांनी ‘ते केव्हाच रद्दीत विकले, तेव्हा रद्दीचा भाव जास्त होता’, असं खोचक उत्तर दिलं.