
मला राजकारणातून संपवण्याचा जाणीवपूर्वक डाव असून, देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी मला तिकीट मिळू नये यासाठी भाजपच्या कोअर ग्रुपमध्ये भूमिका मांडली होती असा खळबळजनक आरोप ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. खडसेंनी जिभेचा दांडपट्टा पुन्हा चालवायला सुरूवात केल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.
फडणवीस आणि महाजनांनी भाजपच्या कोअर ग्रुपमध्ये आपल्याला तिकीट मिळू नये अशी भूमिका मांडल्याची माहिती आपल्याला दिल्लीला मिळाली होती असं खडसे यांनी सांगितले. ‘जेव्हा मी विचारणा केली की मला तिकीट न देण्यासाठी माझा गुन्हा काय आहे ? यावर मला उत्तर मिळालं नाही.’ असे खडसे म्हणाले. स्वत:चं राजकारण सरळ व्हावं यासाठी मला राजकारणातून संपवण्याचा हा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मी त्यांना का नको होतो ते तोच सांगू शकतील असे खडसे यांनी म्हटले.
‘ भाजपच्या कोअर कमिटीमध्ये 17-18 जणांचा समावेश आहे. त्यातील अनेक जण हे वरिष्ठ नेते असून मी त्या सगळ्यांसोबत काम केलेलं आहे. कोअर ग्रुपच्या बहुतांश सदस्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर मला सांगितलं की या बैठकीत फडणवीस आणि महाजन यांनी तिकीट देऊ नये यासाठी आग्रह धरला होता.’ असे खडसे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.कोअर ग्रुपमधील वरिष्ठांनी मात्र खडसेंना तिकीट दिलं पाहिजे असं मत व्यक्त केलं होतं असंही खडसे म्हणाले आहेत.
एकनाथ खडसे यांच्याऐवजी त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना भाजपने विधानसभा निवडणुकीत तिकीट दिले होते. रोहिणी यांच्या पराभवाला पक्षातीलच काही लोकं जबाबदार असल्याचं म्हणणाऱ्या खडसेंनी त्या संदर्भातील पुरावे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना दिले आहेत. नड्डा यांनी कारवाईचे आश्वासन दिले होते, मात्र ते अजून पूर्ण झालेले नाही असं म्हणतानाच खडसे यांनी नड्डा यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आपण पूर्ण समाधानी नसल्याचे सांगितले आहे.
भाजपने मुक्ताईनगरची येणारी जागा घालवली आणि आजूबाजूच्या दहा जागा घालवल्या असं खडसे यांनी म्हटले आहे. ‘ मला भाजपमध्ये भवितव्य दिसत नसेल तर मला अन्य पर्याय शोधावा लागेल’ असा पुनरुच्चार खडसे यांनी केला आहे.40 वर्ष भाजपमध्ये असून पक्ष बदलावा असे माझ्या मनातही आलेले नाही. मग मला पक्ष बदलण्यासाठी का भाग पाडत आहात ? का मला पक्षाबाहेर ढकलता आहात ? असे प्रश् खडसेंनी विचारले आहेत.


























































