मला जसा मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लावला तसाच मुख्यमंत्री शिंदे यांचा घ्या, एकनाथ खडसे यांची भाजपकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
eknath-khadse

नागपुरातील एनआयटी भूखंड घोटाळय़ासंदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनीच तारांकित प्रश्न उपस्थित करून शिंदेंना दोषी ठरविण्याची मागणी केली आहे. भोसरी भूखंड प्रकरणात नैतिक जबाबदारी स्वीकारून मला मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लावणाऱ्या भाजपने शिंदे यांचा एनआयटी प्रकरणात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.

भोसरी भूखंड प्रकरणाशी माझा दुरान्वयेही संबंध नव्हता. मी तो भूखंड खरेदी केला नव्हता, पैसे दिले नव्हते. फक्त मीटिंग घेतली होती. तरीही सत्तेचा दुरुपयोग केल्याचा माझ्यावर आरोप करण्यात आला. नैतिक जबाबदारी स्वीकारून मला राजीनामा द्यायला भाग पाडले आणि नंतर ईडी लावली होती. एनआयटी भूखंड प्रकरणात एकनाथ शिंदे यांनी फक्त मीटिंगच घेतली नाही, तर संबंधित फाईलवर निर्णय घेतला. याचा अर्थ त्यांनी चुकीचे काम केलेले आहे. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे खडसे म्हणाले.

एनआयटी प्रकरणात दुटप्पी भूमिका नको

एनआयटी भूखंड घोटाळाप्रकरणी भाजपने दुटप्पी भूमिका घेऊ नये. मला त्यावेळी राजीनामा द्यायला भाग पाडले होते. आता मुख्यमंत्री शिंदे यांना राजीनामा द्यायला भाग पाडले पाहिजे. भाजपकडे नैतिकता हा विषयच नाही. ही लोक निगरगट्ट आहेत. नैतिकतेच्या आधारावर हे सरकार आलेले नाही, असे एकनाथ खडसे म्हणाले.