रोहिणी खडसेंना तिकीट देणे ही भाजपची खेळी, एकनाथ खडसेंचा भाजपवर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रोहिणी खडसेंना तिकीट देणे ही भाजपाची खेळी होती. भाजपाच्या गद्दार कार्यकर्त्यांनी रोहिणींना पाडण्यासाठी काम केले, त्याविषयी मी चंद्रकांत पाटील यांना दहा महिन्यांपूर्वीच पुरावे दिले होते. मात्र त्यांच्याविरोधात कारवाई झाली नाही. याचा अर्थ त्यांच्यामागे कोणीतरी उभे होतं, हे उघड असल्याचा आरोप आज एकनाथ खडसे यांनी केला.

भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर एकनाथ खडसे आज मुक्ताईनगरमध्ये दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. त्यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी वरील आरोप केला. यावेळी त्यांनी भाजपावर पुन्हा एकदा निशाणा साधला. तर रोहिणी खडसे यांचा पराभव करणाऱ्यांवर कारवाई का झाली नाही, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते म्हणाले की, भाजपने माझ्यावर अन्याय केला. मी भाजप सोडल्यानंतर कार्यकर्त्यांना आनंद झाला आज त्यांचाच उत्सव आहे. आज खऱया अर्थाने माझं सीमोल्लघंन झाले आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तर मी भाजपाला सोडचिठ्ठी द्यावी ही कार्यकर्त्यांची भावना असल्याचे त्यांनी नमूद केले.

देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा साधला निशाणा

माझा भाजपाला विरोध नाही, पण भाजपमधील वाईट प्रवृत्तीबद्दल मी लढा दिला. मला मंत्रीपदावरुन का काढलं हे अजूनही सांगू शकले नाहीत. कारण काय होतं तेही त्यांना सांगता आलं नाही. एका व्यक्तीमुळे माझं नुकसान झालं, असा शब्दात त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीकेची झोड उठविली.