
महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारवर अजूनही न्यायालयाच्या निकालाची टांगती तलवार आहे. न्यायालय काय निकाल देते त्यावर या सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. त्यात मंत्र्यांमध्ये अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता जर वाढली तर हे सरकार कधीही कोसळेल, असा दावा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी जळगावमध्ये केला आहे.
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जे मंत्री आहेत त्यांच्यात एकमेकांवर कुरघोडीचे प्रयत्न सुरू आहेत. अब्दुल सत्तार यांनी याविषयी उघडपणे सांगितले आहे. सत्तारांनी आता हे नेमके कोण आहेत तेदेखील स्पष्ट सांगून टाकावे. त्यांच्या विरोधात जे षड्यंत्र झाल्याचे म्हणत आहेत त्यांची नावे त्यांनी जाहीर करावीत, असे खडसे म्हणाले.
या सरकारमधल्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. प्रत्येकाला मंत्री व्हायचे आहे आणि प्रत्येकाने मंत्रीपदाचे गुडघ्याला बाशिंग बांधून ठेवलेले आहे. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकेल असे वाटत नाही, असे एकनाथ खडसे म्हणाले.





























































