शिंदे गटाचे दादा भुसे, भुमरे, केसरकर नाखूष; चंद्रकांत पाटील, मुनगंटीवार, खाडे अस्वस्थ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये वजनदार आणि मलईदार खाती मिळतील अशी अपेक्षा दोन्ही बाजूच्या आमदारांना होती. मात्र, मविआ सरकारमध्ये असलेल्या मंत्रीपदाचा त्याग करून शिंदे यांची साथ दिल्यावरही महत्त्वाचं खातं न मिळाल्याने शिंदे गटात धुसफूस सुरू झाली आहे. दादा भुसे, संदीपान भुमरे, दीपक केसरकर मनासारखं खातं न मिळाल्याने नाखूष आहेत, तर भाजपचे चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे अपेक्षेपेक्षा दुय्यम दर्जाचे खाते मिळाल्याने अस्वस्थ आहेत.

महाविकास आघाडीविरोधात बंड करून सत्तेत आलेल्या सरकारच्या पहिल्या विस्तारात स्थान न मिळाल्याने शिंदे समर्थक आमदारांत कमालीची नाराजी आहे. त्यातच आता पॅबिनेट मंत्रीपदावर वर्णी लागूनही आधीच्या तुलनेत कमी महत्त्वाचं खातं मिळाल्याने काही मंत्री नाखुष असल्याची चर्चा आहे. मविआ सरकारमध्ये दादा भुसे यांच्याकडे कृषी खात्याचा कारभार होता. नव्या सरकारमध्ये मात्र त्यांच्याकडे त्यापेक्षा कमी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱया बंदरे व खनिकर्म खात्याची जबाबदारी सोपविल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे.

केसरकरांचा अपेक्षाभंग

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अर्थखात्याची जबाबदारी मिळावी यासाठी दीपक केसरकर यांचा प्रयत्न होता. मध्यंतरी त्यांच्याकडे पर्यावरण आणि पर्यटन खात्याची जबाबदारी सोपविली जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्या तुलनेत कमी महत्त्वाच्या आणि डोकेदुखी वाढवणाऱया शिक्षण खात्याचा कारभार सोपविण्यात आल्याने केसरकरांचा अपेक्षाभंग झाला आहे. रोजगार हमी हे जुनंच खातं मिळाल्याने संदीपान भुमरे नाराज आहेत.

चंद्रकांतदादा, मुनगंटीवारांचं पक्षांतर्गत महत्त्व कमी

फडणवीस सरकारमध्ये चंद्रकांत पाटील यांनी महसूल, सहकार, सार्वजनिक बांधकाम यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी पेलली होती. नव्या सरकारमध्ये त्या तुलनेत कमी महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी चंद्रकांतदादा यांच्याकडे सोपवून भाजपमधील त्यांचं महत्त्व आपसूकच कमी करण्यात आलं आहे. फडणवीस सरकारमध्ये अर्थखात्याची जबाबदारी लीलया पेलणाऱया सुधीर मुनगंटीवार यांना वन आणि सांस्कृतिक खात्यापुरतं मर्यादित ठेवून त्यांचा पक्षांतर्गत दबदबा कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

‘खाते कोण’ते महत्त्वाचे नाही – शिंदे

मंत्र्यांच्या नाराजीवर भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले ‘खाते कोण’ते महत्त्वाचे नाही. यापेक्षा मंत्र्यांना मिळालेल्या खात्याला न्याय कसा दिला जातो हे महत्त्वाचे आहे. एकदा मंत्री झाल्यावर तो विशिष्ट विभागापुरता मर्यादित नसतो तर राज्याचा मंत्री असतो. राज्याचा सर्वांगीण विकास आणि सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम मंत्र्याचं असल्याचं शिंदे म्हणाले.

खातेवाटप मुख्यमंत्र्यांचा अधिकार – फडणवीस

खातेवाटप हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो. त्यानुसार त्यांनी खातेवाटप केले आहे. त्यांच्या नेतृत्वात आम्हाला जे खाते मिळाले आहे, त्याला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करणार असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटपाची जबाबदारी झटकली. मंत्रिमंडळाचा विस्तार पूर्णपणे झालेला नाही. जेव्हा विस्तार होईल, तेव्हा आमच्याकडील काही खाती त्यांच्याकडे जातील, असं ते म्हणाले.

नव्या सरकारमध्ये कमी महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी चंद्रकांतदादा यांच्याकडे सोपवून भाजपमधील त्यांचं महत्त्व कमी करण्यात आलं आहे.