‘पन्नास खोके, एकदम ओके’ घोषणा देत शिवसैनिकांचा मिंधेंना दणका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रोड शो दरम्यान निष्ठावंत शिवसैनिकांनी गुरुवारी जोरदार घोषणाबाजी केली. ‘पन्नास खोके, एकदम ओके’च्या घोषणांनी या रोड शोची दाणादाण झाली. पुन्हा घोषणा देऊन प्रत्युत्तर मिळेल, या भीतीने शिवसेना कार्यालयासमोरून हा रोड शो जात असताना अडवून ठेवत पोलीस बळाचा वापर करीत शिवसैनिकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मिंधे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो होता. गंगापूररोड येथे रावसाहेब थोरात सभागृहातील बैठक आटोपून शिवसैनिक जात असताना समोरून हा रोड शो आला. समोरून घोषणा सुरू होताच निष्ठावंत शिवसैनिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. राहुल दराडे, राजेंद्र क्षीरसागर, देवा जाधव, बाळासाहेब कोकणे, ऋषी वर्मा, राजेंद्र नानकर, सुनील जाधव, दिलीप मोरे यांच्यासह शिवसैनिकांनी ‘पन्नास खोके, एकदम ओके’, ‘राजाभाऊ वाजे झिंदाबाद’, ‘उद्धवसाहेब आगे बढो’ आदी घोषणा दिल्या. यामुळे मिंधेंच्या रोड शोमध्ये एकच दाणादाण उडाली. पोलिसांचा सहारा घेत हा रोड शो घाईघाईत पुढे नेण्यात आला.

शिवसैनिकांना अडविले

हा रोड शो शालिमार भागातून शिवसेना जिल्हा कार्यालयासमोरून गेला. येथेही प्रत्युत्तर मिळेल या भीतीने पोलिसांनी शिवसैनिकांना शिवसेना कार्यालयातच अडविले. तरीही शिवसैनिकांनी पन्नास खोके, एकदम ओकेच्या घोषणा दिल्याच.