
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावाच्या शिवरातील दर्गनहळ्ळी रस्त्यावर शेतवस्तीवर राहण्यासाठी असलेल्या दोन कुटुंबीयांच्या घरावर आज पहाटे पाच सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडे टाकले. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात बाबू कल्लप्पा हिरजे या वृद्धाचा मृत्यू झाला आहे, तर अन्य एकजण जखमी झाला आहे.
दरोडेखोरांनी सुरुवातीला बाबू हिरजे यांच्या घरी दरोडा टाकला. यावेळी पती-पत्नी झोपेत होते. दरोडेखोरांनी हिरजे यांच्या पत्नीस चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दीडतोळ्याचे दागिने हिसकावून घेतले. यावेळी बाबू हिरजे यांनी दरोडेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी त्यांच्यावर कुऱ्हाडीसारख्या शस्त्र्ााने वार केले. यात त्यांचा गंभीर जखमी होऊन जागेवरच मृत्यू झाला. त्यानंतर दरोडेखोरांनी जवळील पाटील यांच्या वस्तीवरील घरावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाटील यांनीही दरोडेखोरांचा प्रतिकार करत जोरजोरात आरडाओरडा सुरू केला. या झटापटीत पाटील हेही चाकूचे वार झाल्याने जखमी झाले आहेत. मात्र, पाटील यांनी आरडाओरडा केल्याने लोक येथे गोळा होतील या भीतीने त्यांनी तेथून पलायन केले.
बोरामणी गाव सोलापूर शहराजवळ असून, हायवेवर असल्याने येथे नेहमी वर्दळ असते. दरोडय़ाची घटना कळताच बोरामणीच्या पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती कळताच पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव व सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत. या हल्ल्यात मरण पावलेल्या वृद्ध शेतकऱ्याचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून, जखमीवर येथेच उपचार सुरू आहेत.





























































