चिमुरड्यांवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच लातूरमधील औसा तालुक्यात 70 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करुन हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी भादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मन्सूर सादिक होगाडे असे आरोपी नाव असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्याच्या विकृत वृत्तीला कंटाळून पत्नी, आई आणि भावाने त्याच्याशी संबंध तोडले होते.
मयत वृद्ध महिलेच्या पतीचे अनेक वर्षांपूर्वी निधन झाले होते. सध्या मुलासोबत बोरगाव नकुलेश्वर गावात राहत होती. बोरगावजवळील भेटा व भादा गावात ती घरकाम करायची. अनेकदा ती जेथे कामाला जाईल तिथे मुक्काम करुन दुसऱ्या दिवशी घरी परतत असे. 23 ऑगस्ट रोजी ती नेहमीप्रमाणे कामाला गेली ती परतलीच नाही. कामासाठी गेलेली आई घरी न परतल्याने मुलाने पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, भादा गावात आरोपी मन्सूर सादिक होगाडे याच्या घरी वृद्ध महिला मृतावस्थेत आढळली. महिलेचे दोन्ही हात साडीने एका रॅकला बांधलेले होते. ओरडू नये यासाठी तोंडही बांधलेले होते. गळ्याला साडीने आवळलेले होते. अंगात फक्त ब्लाऊज होते व शरीर निर्वस्त्र होते. मन्सूर सादिक होगाडे यानेच बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.