चिन्हे, बॅच, उपरणी, गमछांची विक्री जोरात; दिल्लीचे झेंडे ठाण्यात फडकले

ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा फिव्हर हळूहळू वाढत चालला आहे. प्रचारासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध असले तरीही पारंपरिक पद्धतीच्या प्रचार साहित्याचीदेखील चलती दिसून येत आहे. दिल्लीचे झेंडे थेट ठाण्यात फडकू लागले आहेत. विविध राजकीय पक्षांचे झेंडे दिल्लीहून ठाण्यामध्ये विक्रीसाठी आणले असून त्यात चिन्हे, बॅच, उपरणे, गमछे यांचाही समावेश आहे. या प्रचार साहित्याची सध्या जोरात विक्री सुरू आहे.

ठाण्यातील बाजारपेठांमध्ये प्रचारासाठी लागणाऱ्या साहित्याची लगबग दिसून येत असून चरई येथील साबू टेक्सटाईल या दुकानात थेट दिल्लीहून साहित्य आणले आहे. झेंडे, उपरणी, कॅप, बॅच, फेटे आणि पगड्या यांची मागणीही लक्षणीय काढली आहे. तब्बल आठ वर्षांनंतर निवडणुका होत असल्याने प्रचार साहित्य घेण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

वुलनच्या मफलरला मागणी

शिवसेना, मनसे, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी अशा विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांना ऐन थंडीत प्रचार करावा लागत असल्याने वुलनच्या मफलरला विशेष मागणी असल्याची माहिती व्यावसायिक आशिष उपाध्याय यांनी दिली.

ब्रँडेड कस्तूंसह झेंडे, स्टिकर, टोपींना भाव

ब्रँडेड वस्तू, झेंडे, स्टिकर, बॅच, शर्ट बटण, मोबाईल स्टिकर, टोपी, शर्ट, झेंडे आदी साहित्य बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. तसेच टी-शर्ट, पोलो शर्ट, टोप्या, बॅग, कि चेन, पेन, मग, पाण्याची बाटली, पॉवर बँक आदींचा भाव वाढला आहे.