
केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) 334 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली आहे आहे. हे पक्ष गेल्या सहा वर्षांपासून (2019 पासून) एकही निवडणूक लढलेले नाहीत आणि त्यांचे कार्यालयांचे पत्तेही शोधून सापडले नाहीत, असे आयोगाने म्हटले आहे. ही कारवाई बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, देशात सध्या 2,800 हून अधिक नोंदणीकृत अपरिचित राजकीय पक्ष आहेत. यापैकी अनेक पक्षांनी निवडणूक आयोगाच्या आवश्यक अटींचे पालन केलेले नाही. या पक्षांनी गेल्या सहा वर्षांत एकही निवडणूक लढवली नाही आणि त्यांचे कार्यालयांचे पत्तेही बोगस किंवा शोधून सापडले नाहीत. यामुळे आयोगाने हे पक्ष नोंदणी यादीतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
नोंदणीकृत अपरिचित राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाकडून काही विशेष सुविधा मिळतात, जसे की निवडणूक चिन्हांचे वाटप, सरकारी प्रसारमाध्यमांवर प्रचारासाठी वेळ आणि मतदार यादीत प्रवेश. मात्र ज्या पक्षांनी निवडणुकीत भाग घेतला नाही, त्यांचा या सुविधांचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. यामुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो आणि खऱ्या राजकीय पक्षांना स्पर्धेत अडथळा येऊ शकतो, असे आयोगाचे म्हणणे आहे.
निवडणूक आयोगाने यापूर्वीही अशा कारवाया केल्या आहेत. मे 2022 मध्ये 87 आणि जून 2022 मध्ये 111 पक्षांची नोंदणी रद्द करण्यात आली होती. तसेच सप्टेंबर 2022 मध्ये 253 पक्षांना निष्क्रिय म्हणून घोषित करण्यात आले होते.