उमेदवारांचा सोशल मीडिया निवडणूक आयोगाच्या रडारवर

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवाराच्या व त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या सोशल मीडियावर तसेच निवडणूक प्रचारावर वॉच ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाचा मीडिया सेल ऍक्टिव्ह झाला आहे. उमेदवारांचे व्हॉटस्ऍप, फेसबुक व ट्विटर हॅण्डलवर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध झाल्यास कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांना सोशल मीडियावर काळजीपूर्वक प्रचार करावा लागणार आहे.

सध्याच्या काळात सोशल मीडियाचा प्रभावी वापर निवडणूक प्रचारात केला जातो. त्याशिवाय टीव्हीच्या माध्यमातूनही मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो. पूर्वी वर्तमानपत्राच्या माध्यमातून प्रचारावर प्रमुख मदार होती, पण आता प्रचारात कालानुरूप बदल होत गेले आणि सोशल मीडिया अतिशय प्रभावी माध्यम झाले आहे. त्यामुळे या माध्यमातून होणाऱया प्रचारावर निवडणूक आयोगाने लक्ष केंद्रित केले आहे. मुंबई शहर जिल्हाधिकारी व मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱयांच्या कार्यालयात मीडिया सेल कार्यान्वित करण्यात आला आहे. या मीडिया सेलच्या माध्यमातून 24 तास टीव्ही चॅनेल, सोशल मीडिया, वर्तमानपत्रे, व रेडिओवरील जाहिरातींवरही लक्ष ठेवण्यात येत आहे. प्रत्येक उमेदवाराला त्यांच्या सोशल मीडियाची व सोशल मीडिया हाताळणाऱयांची यादी निवडणूक आयोगाला सादर करावी लागते. त्याशिवाय कोणत्याही माध्यमातून जाहिरात किंवा मजकूर प्रसिद्ध करण्यापूर्वी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते. निवडणूक आयोगाची परवानगी न घेता जाहिरात प्रसिद्ध केल्यासही कारवाई होऊ शकते.

इलेक्ट्रॉनिक्स मीडियावर वॉच
जिल्हाधिकारी कार्यालयातील मीडिया सेलमध्ये टीव्ही वॉल तयार केली आहे. या कक्षातील टीव्हीवर वेगवेगळ्या नऊ भाषांमधील बातम्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. उमेदवाराच्या प्रचार फेऱया, भाषणे, उमेदवारांची वक्तव्यावर नजर ठेवली जात आहे.

सोशल मीडिया स्कॅनरखाली
उमेदवार व त्यांच्या समर्थकांचे व्हॉटस्ऍप, फेसबुक, ट्विटर तसेच उमेदवारांचे फेसबुक पेज व ट्विटर हॅण्डल सध्या निवडणूक आयोगाच्या स्कॅनरखाली आहेत. काही आक्षेपार्ह मजकूर व विनापरवानगी मजकूर प्रकाशित झाल्यास त्याची माहिती निवडणूक कार्यालयाला कळविण्यात येईल.

आपली प्रतिक्रिया द्या