लोकसभा निकालाआधीच साताऱयातील चार सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल

जिह्यातील सहकारी संस्थांच्या स्थगित केलेल्या निवडणुका घेण्याचा मार्ग दि. 1 जूनला मोकळा होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल दि. 4 जूनला लागणार असला, तरी या निकालाआधीच जिह्यातील 4 सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे.

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका शासन आदेशानुसार ज्या टप्प्यावर असतील, त्या टप्प्यावर स्थगित करण्यात आल्या होत्या. या आदेशास अनुसरून सहकार निवडणूक प्राधिकरणाने राज्य शासनाकडे ज्या सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे; मात्र अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची निवड झालेली नाही, ती करावी किंवा कसे, याबद्दल प्राधिकरणाकडे मार्गदर्शन मागवले होते. त्यावर राज्य शासनाने रिक्त होणाऱया पदांवर लोकसभा निवडणूक आचारसंहिता कालावधीत पदाधिकारी नियुक्ती करता येणार नाही, असे राज्य शासनाने कळवले होते. त्यामुळे राज्य सहकार प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी 3 आणि ई वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना 31 मेपर्यंत स्थगिती दिली होती. आता या निवडणुका दि. 1 जूनपासून सुरू होतील.

अलाईड मागासवर्गीय सहकारी इंडस्ट्रिज कराड, भैरवनाथ विकास सेवा सोसायटी वराडे (ता. कराड), एनपे विकास सेवा सोसायटी एनपे (ता. कराड) व कराड को- ऑपरेटिव्ह नरसिंग होम कराड या संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली होती. तर, जिह्यातील 35 विकास सोसायटय़ांच्या पदाधिकाऱयांची निवडही ठप्प झाली होती. आता दि. 1 जूननंतर हा मार्ग मोकळा होणार आहे.