प्रचार रॅली… मतदारांच्या गाठीभेटी…चौकसभा! उमेदवारांनी साधली रविवारच्या सुट्टीची संधी

महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे दहा दिवस शिल्लक राहिले आहेत. कमी अवधीत जास्तीत जास्त मतदारांना भेटण्यासाठी उमेदवारांनी रविवारच्या सुट्टीची संधी साधत मतदारांच्या घरोघरी जाऊन संवाद साधला. त्यामुळे शहर आणि उपनगरांत संपूर्ण दिवसभर प्रचाररॅलींचा जोश पाहायला मिळाला. सुट्टीमुळे मोठय़ा प्रमाणावर कार्यकर्ते रॅलींमध्ये सहभागी झाले. पालिकेवर भगवा झेंडा फडकावून मुंबई वाचवण्याचा दृढ निर्धार प्रत्येक रॅलीमध्ये करण्यात आला.

पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांच्या हाती प्रचारासाठी खूप कमी दिवस आहेत. त्यामुळे सुट्टीत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी रविवारचा योग साधला. ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसादात प्रचार रॅली काढण्यात आल्या. काही उमेदवारांनी ढोलताशाच्या गजरात रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले, तर अनेक उमेदवारांनी चौकसभा घेत मतदारांनी आपल्यालाच मतदान करावे, असे आवाहन केले. विशेष म्हणजे, रॅलीमध्ये वृद्ध नागरिकही स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले. मुंबई आणि मराठी माणसांसाठी आम्ही ही निवडणूक जिंकणारच, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिक, महिला देत होत्या. राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका 15 जानेवारी रोजी होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान उमेदवारांसमोर आहे. यातच रविवार सुट्टीच्या दिवशी सर्वाधिक मतदार घरी असल्याने त्यांच्या भेटी घेऊन आपला अजेंडा मांडायचा प्रयत्न सर्वच उमेदवारांकडून करण्यात येतो. यातच 11 जानेवारीचा एकच रविवार मिळणार असल्यामुळे उमेदवारांनी रस्त्यावर उतरून प्रचार केला.

उमेदवारांचे औक्षण आणि विकासाची हमी!

मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार घरोघरी पोहोचले असता अनेक ठिकाणी त्यांचे औक्षण करून मतदारांनी आशीर्वाद दिला. तर उमेदवारांनीदेखील आपण केलेल्या कामांचा पाढा वाचत आपल्याला मतदान करून संधी द्यावी, असे आवाहन मतदारांना करण्यात आले.

मतदारांचा पाठिंबा शिवसेनेलाच

महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. आम्ही शिवसेनेच्याच पाठीशी आहोत. भूमिपूत्र मराठी माणसाच्या हक्कासाठी कायम लढत राहिलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देणार, अशा शब्दांत ठिकठिकाणचे मतदार भावना व्यक्त करीत होते.