धुळे महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले

184

सामना प्रतिनिधी, धुळे

प्रभाग रचना आणि त्या प्रभागांचे आरक्षण जाहीर करीत महापालिका आयुक्तांनी महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजविला. शहरातील शाहू महाराज नाटय़ मंदिरात निकष लक्षात घेऊन 19 प्रभागांची रचना जाहीर करण्यात आली. डिसेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत निवडून द्यावयाच्या 74 नगरसेवकांमध्ये 37 महिला असतील. याशिवाय एकूण नगरसेवकात 6 नगरसेवक अनुसूचित जातीचे, 5 अनुसूचित जमातीचे, 20 इतर मागासवर्गीय आणि 43 सर्वसाधारण संवर्गातील असतील. नागरिकांच्या उपस्थितीत प्रभागांचे आरक्षण आणि महिलांच्या जागा शाळकरी मुलांच्या हस्ते चिठ्ठय़ा काढून निश्चित करण्यात आले. या रचनेवर आणि आरक्षणावर नागरिकांना 5 सप्टेंबरपर्यंत हरकती घेता येणार आहे, अशी माहिती आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली.

महापालिकेच्या निवडणुकीविषयी आयोगाच्या निर्देशानुसार गुप्तता पाळीत प्रभागांची रचना निश्चित करण्यात आली. शहराचा विकास हा दृष्टिकोन लक्षात घेऊन प्रभागाच्या रचनेचा आराखडा तयार करण्यात आला होता. या आराखडय़ाला 10 ऑगस्टला विभागीय आयुक्तांनी मान्यता दिली आणि त्यानंतर 18 ऑगस्टला निवडणूक आयोगाने मान्यता दिली. आयोगाच्या निर्देशानुसार 24 ऑगस्टला प्रभागांची रचना जाहीर केली असून या प्रभागांचे आरक्षण, महिलांसाठीचे आरक्षण चिठ्ठय़ा काढून निश्चित करण्यात आले असे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सांगितले.

शाहू महाराज नाटय़ मंदिरात शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास विशेष कार्यक्रम झाला. त्यात लोकसंख्या लक्षात घेऊन राखीव जागांसाठीचे प्रभाग जाहीर करण्यात आले. तसेच महिलांसाठी असलेल्या जागादेखील जाहीर करण्यात आल्या. त्यानंतर शाळकरी मुलांच्या हस्ते चिठ्ठय़ा काढून राखीव प्रभाग आणि सर्वसाधारण प्रभागातील महिलांच्या जागा निश्चित करण्यात आल्या. निर्देशानुसार महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्यात आले आहे. 19 प्रभागातून 74 नगरसेवकांची निवड होईल. त्यात 37 महिला असतील. लोकसंख्येचा निकष लक्षात घेऊन अनुसूचित जातीसाठी 6, जमातीसाठी 5 जागा आरक्षित केल्या आहेत. त्यात प्रत्येकी तीन महिलांची निवड होईल. इतर मागासवर्गीयांसाठी 20 जागा असून त्यातील 10 महिलांसाठी राखीव आहेत. सर्वसाधारण गटाच्या 43 जागांपैकी 21 जागा महिलांसाठी राखीव असतील.

प्रभाग 9 आणि 16 मधून प्रत्येकी 3 नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत तर इतर प्रभागांतून 4 नगरसेवक द्यावयाचे आहेत. ज्या प्रभागातून 4 नगरसेवक द्यावयाचे आहेत त्या प्रभागाची लोकसंख्या 24 हजार 113 निश्चित करण्यात आली तर 3 नगरसेवक निवडून द्यावयाच्या प्रभागासाठी लोकसंख्या 18 हजार निश्चित करण्यात आली. प्रभागांचे आरक्षण, नगरसेवकांचे आरक्षण याबाबत नागरिकांना 5 सप्टेंबरपर्यंत हरकती घेता येतील. आयोगाच्या सूचनेनुसार 15 सप्टेंबरपर्यंत हरकतींवर सुनावणी होईल. डिसेंबरअखेर महापालिकेची निवडणूक होईल, असेही आयुक्त देशमुख यांनी सांगितले.

summary- elections declared for dhule municipal corporation

आपली प्रतिक्रिया द्या