
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यांत घेण्याच्या हालचाली राज्य निवडणूक आयोगाकडून सुरू आहेत. त्यानुसार मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुका तिसऱ्या टप्प्यात म्हणजे जानेवारी 2026 मध्ये घेतल्या जाण्याची दाट शक्यता आहे, तर निवडणुकीचा पहिला टप्पा दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्यात अपेक्षित आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमुळे राज्यात आचारसंहितेचा कालावधी लांबण्याची शक्यता आहे. दुसरीकडे तीन टप्प्यांतील निवडणुकांमध्ये डिसेंबरमध्ये नागपूरमध्ये होणाऱया विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर आचारसंहितेचे सावट असल्याचे सांगण्यात येते.
राज्यात पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील. दुसऱ्या टप्प्यात नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला जाईल, तर शेवटच्या टप्प्यात 29 महापालिकांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. निवडणूक कार्यक्रमाची माहिती आयोगाकडून राज्य सरकारला दिली जाईल. तीन टप्प्यातील निवडणुकांमुळे राज्यात नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान निवडणूक आचारसंहिता लागू राहण्याची शक्यता आहे. अर्थात ही निवडणूक आचारसंहिता संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रापुरती लागू असणार आहे. पण तरीही त्याचा परिणाम नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर होण्याची चिन्हे आहेत. काही भागातील आचारसंहितेमुळे अधिवेशनात सरकारला फार मोठय़ा लोकप्रिय घोषणा करता येणार नाहीत. निवडणुकांच्या कार्यक्रमानुसार हिवाळी अधिवेशाच्या तारखाही पुढे-मागे करण्याची शक्यता नाकारता येत नाही असे जाणकारांचे म्हणणे आहे. आताच्या नियोजित कार्यक्रमानुसार 8 डिसेंबरला हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या 29 महापालिका, 247 नगरपालिका, 147 नगर पंचायती, 34 जिल्हा परिषद आणि 351 पंचायत समितीच्या निवडणुका पुढील वर्षी 31 जानेवारीच्या आत घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची लेखी प्रत अद्याप आयोगाला प्राप्त झालेली नाही. तथापि, न्यायालयाचे निर्देश लक्षात घेऊन आयोगाकडून तीन टप्प्यांत निवडणुका घेण्याची योजना आखण्यात येत आहे.