
राज्यभरात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असली तरी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाचा कारभार सप्टेंबरअखेरपर्यंत डिजिटल मोडनेच चालणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाचा धोका अजूनही कमी झालेला नाही. त्यामुळे पुढील काळातही वीज आयोगासमोर विजेच्या प्रश्नावर केवळ ई-हेअरिंगच्या माध्यमातून सुनाकणी होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली जात आहे. तरीही वीज आयोगाने खबरदारी म्हणून गेल्या चार महिन्यांपासून ई-हेअरिंग सुरू आहे, तीच पद्धत पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबरनंतर राज्य सरकारकडून अनलॉकबाबत घेतला जाणारा निर्णय पाहून प्रत्यक्ष सुनावणीबाबत योग्य निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान विजेच्या प्रश्नावर याचिकाकर्त्यांना वीज आयोगाला काही कागदपत्र, दस्तऐवज सादर करावयाचा असल्यास किंवा आयोगाकडून काही कागदपत्र हवी असतील तर त्यासाठी आयोगाचे कार्यालय सुरू ठेवले आहे.



























































