राज्यावर भारनियमनाचे संकट, अडीच-तीन हजार मेगावॅट विजेची तूट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विजेची मागणी वाढलेली असतानाच औष्णिक वीज केंद्रांना कोळसाटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे राज्यात सध्या 2500 ते 3000 मेगावॅट विजेची तूट निर्माण झाली आहे. ती भरून काढण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात वीज नियामक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार विजेचे भारनियमन करावे लागणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ग्राहकांनी काटकसरीने विजेचा वापर करावा असे आवाहन केले आहे.

तापमानात वाढ झाल्यामुळे सध्या महाराष्ट्रासह देशभरात विजेच्या मागणीत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये तत्पुरते भारनियमन सुरू असले तरी महाराष्ट्रात भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र कोळसाटंचाईमुळे महावितरणला औष्णिक वीज प्रकल्पातून मिळणाऱया विजेमध्ये सहा हजार मेगावॅटची घट झाली आहे. तसेच केंद्रीय एक्सचेंजमधूनही पुरेशी वीज उपलब्ध होत नाही. त्यामुळे राज्यात गरजेनुसार तात्पुरते भारिनयमन करावे लागेल असे महावितरणने म्हटले आहे.

  • महावितरणचे सध्याचे 37 हजार 900 मेगावॅटचे वीज खरेदी करार असून त्यापैकी 33 हजार 700 मेगावॅटच्या प्रकल्पातून वीज निर्मिती असून त्यामध्ये औष्णिक प्रकल्पाची क्षमता 21 हजार 57 मेगावॅट म्हणजे 62 टक्के आहे. मात्र सध्या कोळसाटंचाईमुळे येथील वीजनिर्मितीमध्ये मोठी घट झाली आहे.
  • विजेच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर महावितरणकडून अतिरिक्त वीज मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनकडून दररोज 673 मेगावॅट वीज उपलब्ध होत आहे, तर कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडकडून (सीजीपीएल) 760 मेगावॅट वीज खरेदी करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यापैकी 415 मेगावॅट वीज आज मध्यरात्रीपासून उपलब्ध झाली आहे.

कोयना धरणातील जादा पाणी वापरता येणार

कोयना जलविद्युत प्रकल्पातून सध्या 1800 मेगावॅट विजेची निर्मिती सुरू आहे. येत्या 31 मेपर्यंत वीजनिर्मितीसाठीचे 17 टीएमसी पाणी शिल्लक आहे. पण सध्या विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी दररोज 0.70 टीएमसी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पाणी वापरले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीचा विचार करून वाढीव 10 टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी वापरण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळू शकणार आहे.

महावितरणकडील विजेची मागणी, 25 हजार 500 मेगावॅटवर जाणार

औद्योगिक वीज वापराबाबतच कृषिपंपाचा वीजवापरही वाढला आहे. त्यामुळे राज्यात 28,000 मेगावॅटपेक्षा अधिक विजेची विक्रमी मागणी नोंदली जात आहे. त्यामध्ये राज्याची मागणी 24 हजार 500 मेगावॅट, तर मुंबईची मागणी साडेतीन हजार मेगावॅटच्या घरात आहे. गेल्या पंधरवडय़ापासून महावितरणकडे तब्बल 24800 मेगावॅट एवढी विजेची मागणी नोंदली जात आहे. ती लवकरच 25 हजार 500 मेगावॅटवर जाईल अशी स्थिती आहे. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळीही मुंबईसह राज्याची विजेची मागणी 23 हजार मेगावॅटपर्यंत नोंदली जात आहे.