
सामना ऑनलाईन, संगमेश्वर
आरवली माखजन भागात वीज पुरवठ्याचे तीनतेरा वाजले आहेत. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे भरपावसाळ्यात आरवली येथील नळ पाणी पुरवठा योजना आठवडाभर बंद पडली आहे. आरवली वीज उपकेंद्रातील अधिकारी वीज समस्या दूर करीत नसल्याने त्यांची उचलबांगडी करावी अशी मागणी करण्यात येत आहे. आरवली येथील महावितरण केंद्रातून सुमारे २२ गावांना वीज पुरवठा करण्यात येतो. वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने त्याचा फटका नळपाणी योजनांना बसतो आहे.
आरवली , माखजन , कुंभारखणी भागात पाऊस होत असल्याने सतत वीज पुरवठा खंडीत होतोय. सकाळी आणि संध्याकाळी जेव्हा वीजेची आवश्यकता असते तेव्हाच नेमकी वीज गायब होते. पावसाळ्यापूर्वी वीजपुरवठा खंडीत होऊ नये म्हणून ज्या उपाययोजना करणं गरजेचं होतं, त्या उपाययोजना करण्यात आल्या नाही. आरवली उपकेंद्राकडून वीजपुरवठा सुरळित रहावा यासाठी प्रयत्न करण्याऐवजी वसुलीकडेच अधिकारी लक्षात देत आहेत. परिस्थिती अशीच कायम राहिली तर महावितरणच्या कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढू असा इशारा इथल्या ग्रामस्थांनी दिला आहे.



























































