
कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात वीज चोऱया वाढल्या असल्याचे समोर आले आहे. एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत तब्बल 3655 वीज चोरीची प्रकरणे महावितरणने कारवाई करत उघडकीस आणली आहेत. यामध्ये सुमारे 19 कोटी रुपयांची वीज चोरी झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. लॉकडाऊनपूर्वी 2019मध्ये मुंबई परिसरात वर्षभरात केवळ 1418 वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आली होती.
मुंबईच्या भांडुप, मुलुंडसह नवी मुंबई, ठाणे परिसरात भांडुप परिमंडळाच्या माध्यमातून वीजपुरवठा केला जातो. येथे सुमारे 30 लाख वीज ग्राहक आहेत. कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यापासून महावितरणच्या दक्षता पथकाने सुरुवातीला आपली कारवाई थांबवली होती. याचा गैरफायदा घेत अनेक औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांनी वीज मीटरला बायपास करत थेट वीज वाहिनीला जोडलेल्या केबलमधून बेकायदेशीरपणे वीजपुरवठा घेतल्याने संबंधितांचा वीज वापर कमी नोंदला जात होता. तसेच घरगुती ग्राहकांकडूनही एकाच वीज मीटरवरून अनेक घरांना वीजपुरवठा दिला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यापार्श्वभूमीवर महावितरणच्या भांडुप परिमंडळात कार्यरत असलेल्या दक्षता पथकाने ग्राहकाचा प्रत्यक्ष वीज वापर तपासण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार एप्रिल-डिसेंबर या कालावधीत 3655 वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आल्याचे भांडुप परिमंडळाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी स्पष्ट केले आहे.

























































