माधुरी हत्तीण परत येणार, मठाच्या जागेत वनताराचे संवर्धन केंद्र उभारणार

 महाराष्ट्र आणि कर्नाटकातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेली कोल्हापूरची महादेवी अर्थात माधुरी हत्तीण लवकरच नांदणी मठात परतणार आहे. उच्चाधिकार समितीने नांदणी मठाच्या जागेवर वनताराचे पुनर्वसन केंद्र उभारण्यास आवश्यक त्या सर्व परवानग्या दिल्या आहेत. तसेच हत्तीणीच्या आरोग्याबाबत तपासणी समितीने समाधानकारक अहवाल सादर केला आहे. त्यामुळे माधुरी कोल्हापूरला परत येण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाला अनुसरून माधुरी हत्तीणीबाबत निर्णय घेण्यासाठी मुंबईत उच्चाधिकार समितीसमोर सुनावणी झाली. यावेळी डॉ. मनोहरन यांच्या अध्यक्षतेखालील तपासणी समितीने माधुरीच्या आरोग्याबाबत समाधानकारक अहवाल सादर केला. समितीने आपल्या अहवालात नांदणी मठाचे माहुत आणि माधुरी हत्तीणीचे नातेदेखील अधोरेखित केले आहे. तसेच वनताराच्या पुनर्वसन केंद्राच्या बांधकामासाठी सात टप्प्यांत मंजुरी देण्यात आली असून 12 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे, अशी माहिती नांदणी मठाचे वकील मनोज पाटील यांनी दिली. डॉ. मनोहरन यांच्या समितीच्या अहवालाच्या आधारे माधुरी हत्तीणीची पुढील टप्प्यात पुन्हा एकदा तपासणी करण्यात येणार आहे. माधुरी हत्तीण मागील पाच महिन्यांपासून गुजरातच्या वनतारा येथे वास्तव्यास आहे. तिला कोल्हापूरला परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.