
मध्य रेल्वेच्या घाटकोपर रेल्वे स्थानकाचा मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्यावतीने पुनर्विकास करण्यात येणार आहे. नव्या घाटकोपर स्थानकावरील सर्व प्रवासी सुविधा या पश्चिम रेल्वेच्या गोरेगाव स्थानकाप्रमाणे एलिवेटेड डेकवर असतील आणि सरकते जिने तसेच लिफ्टने हे स्थानक सुसज्ज होणार असल्याने मेट्रो स्थानकातून प्रवेश करणार्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेचे घाटकोपरही आता कात टाकीत ‘हायफाय’ होणार आहे.
घाटकोपर स्थानकांतून दररोज 1.93 लाख प्रवासी प्रवास करत असतात तसेच सरासरी 3.87 लाख प्रवाशांची दररोज येजा होत असते. या प्रवाशांना आता नव्या घाटकोपर स्थानकांतील ‘एलिवेटेड डेक’ प्रवाशांना तीन पादचारी पुलांशी जोडणारे तब्बल 12 मीटर रूंदीच्या जिन्यांनी जोडण्यात येणार आहे. तसेच सरकते जिने आणि रस्त्यांवरील स्कायवॉकलाही या डेकला जोडण्याची योजना असल्याने प्रवाशांना विनाअडथळा स्थानकात प्रवेश आणि बाहेर पडण्यास मोकळीक मिळणार आहे. घाटकोपर ‘एलिवेटेड डेक’ बांधण्यासाठी स्थानकाच्या पूर्वेकडील जुने तिकीट घर पाडण्यात आले असून प्लॅटफॉर्म क्र.१च्या दिशेने पायाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. अंधेरी व गोरेगावप्रमाणे मेट्रो स्थानकाशी जोडलेल्या एलिवेटेड डेकवर तिकीट घर आणि इतर सुविधा मिळणार आहे.
असा आहे प्लान
– सध्याचा कल्याण दिशेकडील जुना 4 मीटर रूंदीचा पादचारी पाडून नवा डबल डिस्चार्जचा 12 मीटरचा पादचारी पूल उभारण्यात येणार आहे.
– सध्याच्या मधल्या 12 मीटर रूंदीचा पादचारी पुलाच्या उत्तर दिशेला आणखी एक 12 मीटर रूंदीचा पादचारी पूल बांधण्यात येईल.
– सीएसएमटी दिशेच्या 4 मीटर रूंदीच्या पादचारी पुलाच्या ऐवजी डबल डिस्चार्जचा 12 मीटर रूंदीचा नवा पादचारी पूल उभारला जाईल.
– 7.4 मीटर रूंदीचा एलिवेटेड डेक तयार करण्यात येऊन त्याला मेटो वनच्या स्थानकाशी आणि 12 मीटरच्या तीन पादचारी पुलांशी जोडले जाईल.
– मेट्रो स्थानकाशी कनेक्ट होण्यासाठी पायर्या व रॅम्प बांधण्याचीही योजना आहे. मेट्रो स्थानकाशी घाटकोपर स्थानकाला जोडण्यासाठी रस्त्यावर नवीन स्कॉयवॉक बांधण्यात येईल.
– सध्याच्या स्कायवॉकला स्थानकाला जोडण्यासाठी 6 मीटर रूंदीचा जोड रस्ता बांधण्यात येईल.



























































