
अद्याप अकरावी ऑनलाइन प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य फेरीच्या केवळ दोनच संधी उपलब्ध आहेत. उद्या 12 ऑक्टोबरपासून दहावी उत्तीर्ण सर्व इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज करता येणार असून 14 ऑक्टोबरपासून एकटीकेटीच्या विद्यार्थ्यांनादेखील अर्ज करता येईल. आतापर्यंत मुंबई विभागात अकरावी ऑनलाइन प्रवेशाद्वारे 86.06 टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून एक लाखाहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत. प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य फेरी संपल्यानंतर 18 ऑक्टोबरला रिक्त जागांचा तपशील जाहीर होणार आहे.
11 ऑक्टोबरपर्यंत दहावीत 50 टक्क्यांपर्यंत गुण असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रक्रियेद्वारे अर्ज करण्यासाठी वेळ देण्यात आला होता. आता उद्या 12 ऑक्टोबरपासून दहावी उत्तीर्ण असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. 12 ऑक्टोबर सकाळी 10 वाजल्यापासून ते 13 ऑक्टोबर सकाळी 10 वाजेपर्यंत विद्यार्थी ऑनलाइन अर्ज भरू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झाले आहे त्यांना प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेण्यासाठी 13 ऑक्टोबर सायंकाळी 6 वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे, तर एटीकेटीच्या विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार असून हे विद्यार्थी 18 ऑक्टोबर सकाळी 10 वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. एटीकेटीबरोबरच दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या फेरीतदेखील प्रवेश अर्ज करण्याची संधी कायम असणार आहे. कॉलेज अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेण्यासाठी 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुदत आहे.
आतापर्यंतची अकरावी प्रवेशाची स्थिती
एकूण जागा 3,21,540
विद्यार्थी 2,50,505
प्रवेश मिळाले 2,16,314 (86.34 टक्के)
प्रवेश घेतला नाही 34,910 (13.66 टक्के)
रिक्त जागा 105226 (32.73 टक्के)


























































