एलि कोहेन – देशासाठी भर चौकात फासावर जाणारा गुप्तहेर

1895

>> तुषार ओव्हाळ 

एलि कोहेन हा इस्राएलचा गुप्तहेर नुकताच चर्चेत आला आहे. त्याचे कारण नेटफ्लिक्सवरील द स्पाय ही वेबसीरीज एलिच्या कारकीर्दीवर बेतली आहे.

इस्राएलच्या अनेक मोहिमा गाजल्या आहेत. त्यापैकी ‘द रॉथ ऑफ गॉड’, ‘द रेड सी’, ‘ऑपरेशन मोसेस’, ‘ऑपरेशन डायमंड’ ही त्यापैकी काही निवडक नावं. परंतु इस्राएलची जेवढ्या मोहिमा यशस्वी झाल्या त्याचे कारण त्यांचे गुप्तचर. एलि कोहेन हा मोसादचा गुप्तहेर होता. ज्याने शत्रू राष्ट्र सिरीयामध्ये जाऊन माहिती गोळा केली आणि आपल्या राष्ट्राला पाठवली. या माहितीमुळेच इस्राएलाला अरबांविरोधातील अशक्य असे युद्ध जिंकता आले. परंतु हा विजय पाहण्यासाठी तो जिवंत नव्हता. कारण सिरीयामध्ये गुप्तहेर म्हणून काम करताना शत्रूराष्ट्राने त्याला रंगेहात पकडले आणि भर चौकात त्याला फाशीची शिक्षा सुनावली.

एलि कोहेन. त्याचा जन्म 1924 साली इजिप्तमधील अलेक्झांड्रियामधील एका ज्यु कुटुंबात झाला. हा तो काळ होता जेव्हा ज्युंवर जगभरात अत्याचार सुरू होते. पॅलेस्टाईनमध्ये ज्युंच्या राष्ट्राची मागणी जोर धरत होती. एलिन ज्या विद्यापीठीत शिकत होता त्या विद्यापीठात मुस्लिम ब्रदरहूडचे लोक त्याला ज्यु असल्याने त्रास देत होते. अखेर त्याने विद्यापीठ सोडले आणि घरीच अभ्यास सुरू केला. नंतर 1948 साली ज्युंचे इस्राएल राष्ट्र निर्माण झाले तेव्हा जगभरातील अनेक ज्यु कुटुंबे इस्राएलमध्ये स्थायिक झाले. एलिचे आई वडील आणि तीन भावडं 1949 साली इजिप्तहून इस्राएला स्थायिक झाले. आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी एलिने नव्या राष्ट्रात जाण्यास नकार दिला. आणि इजिप्तमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. 1950 साली अनेक इजिप्शियन ज्युंनी इस्राएलमध्ये पलायन केले. अशा ज्युंना एलिने मदत केली.

पुढे सुएझ कालव्यावरून अरब आणि ज्युंमध्ये तणाव वाढला. तेव्हा इजिप्तमधून सर्व ज्युंना देशातून हाकलून लावले. तेव्हा एलि इस्राईलमध्ये दाखल झाला. इस्राएलमध्ये आल्यानंतर त्याने नवराष्ट्रातील संरक्षण खात्यात नोकरी मिळवली. परंतु त्याला इस्राएलची गुप्तचर संघटना मोसादमध्ये काम करण्याची इच्छा होती. त्यासाठी एलिने दोनदा मोसादमध्ये अर्ज केला होता. परंतु मोसादने त्याचा अर्ज रद्द केला. संरक्षण खात्यात काम करून एलि कंटाळला. शेवटी त्याने एका विमा कंपनीत साध्या कारकुनाची नोकरी पत्करली.

दरम्यान 1959 साली एलिचे नादिया या इराकच्या ज्यु निर्वासित तरुणीशी लग्न झाले. इस्राएल आणि अरब संघर्ष थांबला नव्हता. इस्राएलच्या सीमेवर सिरीया बॉम्ब हल्ले करत होते. त्यात निष्पाप इस्राएली नागरिकांचा बळी जात होता. म्हणून सिरीयामध्ये एक गुप्तहेर पाठवावा अशी मोसादची योजना होती. अनेक उमेदवार पाहिल्यानंतर मोसादने या मोहिमेसाठी एलिची निवड केली. त्यासाठी एलिला सहा महिन्याचे कठोर प्रशिक्षण देण्यात आले. त्यात पाळत ठेवणे, शत्रूराष्ट्राचे गुप्तहेर पकडणे गुप्त पद्धतीने संदेश पाठवणे अशा कामांचा समावेश होता. तसेच सिरीयन ऍक्सेंटमध्ये अरबी बोलण्याचेही प्रशिक्षण त्याने घेतले. सहा महिन्यात एलिने आपले प्रशिक्षण पूर्ण केले.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर एलिने कामेल अमिन थाबेत हे नाव धारण केले. आणि आपण सिरियन व्यावसायिक असून अर्जेंटिनाहून मायदेशी परत आलो अशी कथा रचली. सिरीयामध्ये आल्यानंतर त्याने देशातील अनेक राजकारणी आणि सैन्यातील अनेक बड्या लोकांशी त्याने मैत्री करून त्यांचा विश्वास संपादन केला.  अशा लोकांकडून माहिती मिळवण्यासाठी एलिने अनेक शक्कल लढवल्या.

एलि आपल्या अलिशान घरात मोठ मोठ्या पार्ट्यांचे आयोजन करत असे. तिथे दारू आणि सुंदर तरुणींचा राबता  असायचा. या पार्टीच्या वेळी अनेक राजकारणी आणि सैन्यातील बडे अधिकारी गप्पा मारताना गुप्त युद्धविषयी माहिती सांगायचे. पार्टी संपल्यानंतर एलि आपल्या मशीनमधून कोड भाषेत ही माहिती इस्राएलला पाठवायचा. अनेकदा ही माहिती तो लिखित स्वरुपात ही पाठवायचा. परंतु ही खूपच खासगी माहिती असल्याने आणि शत्रू राष्ट्राला कळता कामा नये यासाठी तो Invisible ink म्हणेजेच एका विशेष शाईचा वापर करत असे. त्या शाईने लिहिल्यावर विशिष्ट रंग त्यावर पडल्यानंतरच ती माहिती वाचता येत असे. 1961-65 या काळात मोठ्या प्रमाणात एलिने मोसादला माहिती पाठवली.

एलिचे सर्वात मोठे यश म्हणजे गोलन टेकडीवरील माहिती आणि लावलेली झाडे. गोलेन टेकडीवर सिरीयाने मोठ्या प्रमाणात सैन्य ठेवले होते. ही जागा तशी उजाड होती आणि तिथली उष्णता ही भयंकर होती. या ठिकाणी इलिने अनेक भेटी दिल्या. अनेक सैनिकांशी चर्चा केली. सर्व जागा तो आपल्या नजरेत भरत असत आणि त्याचे नकाशे काढून मोसादला पाठवत असत. दुसरी कामगिरी म्हणजेच त्याने सिरीयन सैन्याशी कळवळा दाखवला. भर उन्हात सैनिक उभे राहू शकत नाही म्हणून त्याने या भागात मोठ्या प्रमाणात झाडे लावली. नंतर इस्राएल -इजिप्त युद्धात इस्राएलने इथे थांबलेल्या शत्रू राष्ट्रांच्या सैनिकांना लक्ष्य करून मारले.

सिरीया एका रांगेत बंकरची निर्मिती करत असल्याची माहिती मोसादला मिळाली होती. परंतु सिरीया बंकरची फक्त एकच नव्हे तर अशा तीन रांग निर्माण करत असल्याची माहिती एलिने मोसादला कळवली. त्यामुळे शत्रू राष्ट्राचे सैन्य कुठे असणार आहे त्याची अचूक माहिती इस्राएला कळाली.

अखेर 1964 साली एलिने इस्राएला भेट दिली आणि संशयाची ठिणगी पडली. एलिला तिसरे अपत्य झाले होते आणि काही खासगी माहिती मोसाद आणि सैन्याला द्यायची होती म्हणून तो इस्राएला आला होता. आपल्या बाळाला पाहून पुन्हा सिरीयामध्ये जाणार नाही असा निर्णय एलिने मोसादला कळवला. परंतु ही शेवटचे ऑपरेशन असेल अशी गळ मोसादने घातली आणि एलिला पुन्हा सिरीयाला जावे लागले. ‘मी पुन्हा येईन’ असे एलिने आपल्या बायकोला म्हटले आणि आपल्या शेवटच्या मोहिमेला निघाला.

ही मोहीम खर्‍या अर्थाने एलिची शेवटची मोहीम ठरेल हे कुणालाच वाटले नव्हते. सिरीयाच्या गुप्तचर संघटनेत कर्नल अहमद सुदानी याची नवीनच नियुक्ती झाली होती. तो कुणावरच विश्वास ठेवत नसे. त्यात एलि हा इस्राएल भेटीवर गेल्याने त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

अखेर 24 जानेवारी 1965 सालच्या रात्री सिरीयन गुप्तचर कार्यालयात रशियन यंत्रणेत काही संदिग्ध रेडियो लहरी पकडल्या गेल्या. या लहरी कामिल अमिन थाबेत म्हणजेच एलिच्या घरातून येत होत्या हे निष्पन्न झाले. कर्नल अहमद याने एलिच्या घरी सैनिक पाठवले. सैनिकांनी एलिला इस्राएला माहिती पाठवताना रंगेहात पकडले.

एलिला जबर मारहाण करण्यात आली. त्याच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. त्याच्याकडून इस्राएअलची माहिती उकळण्याचा सिरीयाच्या सैन्याने प्रयत्न केला. परंतु एलि बधला नाही त्याने कुठलीच माहिती त्यांना दिली नाही.

अखेर सिरीयन शासनाने त्याला कुठल्याही खटल्याशिवाय फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर इस्राएलने एलिला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. इस्राएलच्या तत्कालीन परराष्ट्र मंत्री गोल्डा मायर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर एलिला वाचवण्यासाठी चळवळ हाती घेतली होती. अनेक राष्ट्राचे पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष, राजदूत यांनी सिरीयाकडे एलिच्या प्राणांची याचना केली. पोप पॉल 5 यांनीही सिरीयाच्या राष्ट्राध्यक्षांकडे गळ घातली होती. पण सिरीयन सरकार बधले नाही.

15 मे 1965 रोजी एलिने आपली प्रिय पत्नी नादियाला पत्र लिहिले. ‘प्रिये भुतकाळाविषयी अश्रू गाळू नकोस. भविष्याचा विचार कर आणि आपली काळजी घे…’

एलिला याच दिवशी सिरीयाची राजधानी दमाकसमध्ये मारजे चौकात हजारो लोकांच्या समोर फाशी देण्यात आली.

त्याच्या मृत्यूनंतर अरब राष्ट्र आणि इस्राएलमध्ये युद्ध सुरू होते. या युद्धात एलिने पाठवलेल्या माहितीमुळे इस्राएलला यश मिळवता आले.

मृत्युनंतरही एलि सुटला नव्हता. एलिच्या अंत्यसंस्काराठी त्याचा मृतदेह ताब्यात मिळावा अशी मागणी एलिची बायको नादियाने केली होती. परंतु सिरीयाने ही मागणी फेटाळली. सिरीयाला मोसादबद्दल कल्पना होती. त्याच्या मृतदेहाचा कुणालाचा थांगपत्ता लागू नये म्हणून सिरियन सरकराने त्याचा तीन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी दफनविधी केला.

2018 साली सिरीयन सरकारने एलिचे एक घड्याळ लिलावात काढले होते. जेव्हा मोसादला ही गोष्ट कळाली तेव्हा त्यांनी मोठ्या शिताफीने हे घड्याळ मिळवले. मोसादने हे घड्याळ नादियाकडे सोपवले होते. आता हे घड्याळ मोसादच्या कार्यालयात एलिच्या आठवणीने जतन करून ठेवले आहे.

eli-chohen-watch

इस्राएलमध्ये एलि हिरो ठरला होता. संपूर्ण देशात ठिकठिकाणच्या रस्त्यांना, संस्थांना त्याचे नाव देण्यात आले होते. राजधानी जेरुसलेममध्ये त्याचे स्मारक उभारण्यात आले.

आता नुकतंच साशा बोराट कोहेन याने एलि कोहेनची भूमिका ‘द स्पाय’ या वेबसीरीज मध्ये वठवल्याने जागतिक स्तरावार त्याचे नाव पुन्हा उजळले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या