नावातच ‘कस्तुरी’ असलेले एलन मस्क अंतराळ

>> सुजाता बाबर

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून सध्या चर्चेत आलेले एलन मस्क त्यांच्या श्रीमंत असण्यापेक्षाही त्यांच्या कार्यासाठी आणि अंतराळ मोहिमा आखणाऱया स्पेसेक्ससाठी जास्त प्रसिद्ध आहेत. जगाच्या आधुनिक होण्याच्या महत्त्वाकांक्षेला अधिक पुढे नेण्यात त्यांच्या कार्याचा मोठा वाटा आहे. यामुळेच त्यांच्या कीर्तीचा सुगंध नावाप्रमाणेच सर्वदूर पसरला आहे.

काही दिवसांपासून एलन मस्क यांचे नाव चर्चेत सतत येत आहे. जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या ऍमेझॉनच्या जेफ बेजॉस यांना मागे टाकून एलन मस्क आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. यावर’स्ट्रेंज असे उत्तर देणारे एलन मस्क अनेक कंपन्यांचे संस्थापक, उद्योगपती, संचालक, अभियंता आणि शोधकर्ता म्हणून ओळखले जातात. 6 फेब्रुवारी 2018 रोजी त्यांच्या स्पेसएक्स या खाजगी कंपनीचे फॉल्कन हेवी रॉकेट चंद्रावर पाठवण्यात आले होते.

अंतराळ हा मानवाच्या अस्तित्वाचा पुढचा टप्पा आहे यावर त्यांचा ठाम विश्वास आहे आणि ‘मंगळावर घर असायला काय हरकत आहे?’ असेही त्यांचे म्हणणे आहे. स्पेसएक्स ही कंपनी इतर ग्रहांवर पोहोचण्याच्या ध्यासातूनच निर्माण झाली आहे. फॉल्कन हेवी या रॉकेटमध्ये एलन मस्क यांची टेस्ला कार ठेवण्यात आली होती आणि अंतराळामध्ये जाणारी ही पहिली कार आहे! टेस्ला कंपनीदेखील एलन मस्क यांची आहे.

28 जून 1971 रोजी एलन मस्क यांचा जन्म झाला. आई कॅनेडियन आणि वडील दक्षिण आफ्रिकी. त्यांचे बालपण आफ्रिकेच्या प्रिटोरिया येथे गेले. कॅनडाला जाण्यापूर्वी त्यांनी प्रिटोरिया विद्यापीठात शिक्षण घेतले. त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती. कॉलेजमधील युवादेखील वाचत नाहीत अशी मोठमोठी पुस्तके लहान वयातच त्यांनी वाचली होती. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी त्यांनी कॉमोडोर व्हीआयसी-20 या तंत्राचा वापर करून संगणनाची रुची घेतली. केवळ मॅन्युअलच्या आधारे वयाच्या 12 व्या वर्षी त्यांनी स्वतः तयार केलेला बेसिक आधारित व्हिडीओ गेमचा कोड 500 डॉलर्सना विकला. ते पीएच.डीकरिता कॅलिफोर्नियाला गेले. तेथे शिक्षण पूर्ण न करता ते व्यवसायात घुसले. त्यांनी झिप-2 ही वेब सॉफ्टवेअर कंपनी स्थापन केली. पुढे 1999 मध्ये हीच कंपनी कॉम्पॅकने 307 दशलक्ष डॉलर्समध्ये विकत घेतली. त्यानंतर एक्सडॉटकॉम या ऑनलाइन बँकेची स्थापना केली. ती 2000 मध्ये कॉन्फिनिटीमध्ये विलीन झाली आणि त्यामध्ये पेपाल नावाची पैसे हस्तांतरण सेवा निर्माण केली. पुढे ही कंपनी ईबेने 1.5 अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतली. गंमत म्हणजे 2017 मध्ये एलन मस्क यांनी केवळ भावना गुंतलेल्या असल्याने एक्सडॉटकॉम हे डोमेन पुन्हा विकत घेतले.

मंगळावर जाऊन शेती करता येईल का अशा विचारांनी झपाटून त्यांनी संशोधन सुरू केले. या ध्यासातून इतिहास लिहिणारी स्पेसएक्स नावाची कंपनी त्यांनी 2002 मध्ये स्थापन केली. आंतराराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर सामानाची देवाणघेवाण करण्यासाठी याच कंपनीच्या ड्रगनचा वापर करण्यात येतो. स्पेसएक्स कंपनीचे नासा आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासोबत उत्तम कार्य आहे. मानवी मोहिमांचे खर्च कमी व्हावेत यासाठी ही कंपनी प्रयत्न करीत आहे. 30 मे 2020 रोजी स्पेसएक्सने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर मानवी मोहीम प्रथमच पाठवली. एखाद्या व्यक्तीला स्थानकाच्या कक्षेमध्ये ठेवून क्रू स्थानकावर पाठविणारी स्पेसएक्स ही पहिली खासगी कंपनी बनली.

अजून एक इतिहास रचला आहे तो त्यांच्या टेस्ला कंपनीने. टेस्ला रोडस्टर ही इलेक्ट्रिक स्पोर्टस् कार टेस्ला मोटर्सने प्रथम बनविली आणि आज ती 31 देशांमध्ये फिरते आहे. मानवी मेंदू आणि कृत्रिम बुध्दिमत्ता यांना एकत्र करून वापर करण्यासाठी त्यांनी 2016 मध्ये न्यूरोलिंक ही कंपनी स्थापन केली. अर्थातच त्याला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले. रहदारीचा वाढता प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी भुयारी मार्ग बांधणारी ‘दी बोरिंग कंपनी’ स्थापन केली. सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर व्हावा म्हणून सोलर सिटी ही संकल्पना रुजविण्याचा प्रयत्न केला. अशा अनेक तांत्रिक कंपन्या स्थापन करून समाधान न झालेल्या महत्त्वाकांक्षी एलन मस्क यांनी संगीत क्षेत्रामध्ये अनेक गाणी स्वतः रचून स्वतःच्या आवाजात प्रसिध्द केली आहेत. त्यांचे राजकीय दृष्टिकोन आणि इतर विचारांना आणि कृतींना टीकेला सामोरे जावे लागले.

ते अत्यंत लोकप्रिय व्यक्ती आहेत. त्यांच्यावर असंख्य लेख लिहून आले आहेत, अनेक लघुपट निर्माण झाले आहेत. सामाजिक कार्यातदेखील त्यांचा मोठा वाटा आहे. मस्क फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेमार्फत ते कार्य करतात. ही संस्था प्रामुख्याने अंतराळ संशोधन तसेच अक्षय आणि प्रदूषणविरहित ऊर्जेच्या शोधासाठी कार्य करते. तसेच जगभरात दोन कोटी वृक्ष लावण्यासाठी भरघोस देणगी दिली आहे.

एलन मस्क यांची कीर्ती कस्तुरीप्रमाणे सर्वांना सुगंध, प्रेरणा देत असते. 2018 मध्ये रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून त्यांची निवड झाली होती. त्याच वर्षी फोर्ब्सच्या जगातील सर्वात शक्तिशाली लोकांच्या यादीत ते 25 व्या स्थानावर होते. आता 2021 मध्ये ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांना स्वतःला मात्र संपत्तीविषयी फार कल्पना नाही असे नम्रपणे सांगून ते म्हणतात की, मला सतत नवनवीन आविष्कारांमध्ये रस आहे!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या