
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्कची अमेरिकन इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्लाचे आता हिंदुस्थानात आगमन झाले आहे. कंपनीचा पहिले शोरूम मुंबईत सुरू झाले आहे. सध्याच्या घडीला टेस्ला हिंदुस्थानात मॉडेल वाय लाँच करणार आहे. ही कार अमेरिकेपेक्षा हिंदुस्थानात महाग विकली जाणार आहे. कंपनी दिल्ली आणि बंगळुरूसारख्या मोठ्या शहरांमध्येही शोरूम उघडणार आहे.
टेस्लाने मुंबईत उघडलेल्या या शोरुमची पाटी मराठीत असल्याने, सर्वांचेच लक्ष वेधले जात आहे. एलोन मस्कची कंपनी सध्या हिंदुस्थानात टेस्ला मॉडेल वाय लाँच करणार आहे. ही ईव्ही कार एका प्रकारे एसयूव्हीसारखी असून, ही कार सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. टेस्ला मॉडेल वाय सोबत, टेस्ला मॉडेल 3 देखील हिंदुस्थानात लाँच केले जाऊ शकते. या कारची किंमत हिंदुस्थानात 60 ते 70 लाख रुपयांपर्यंत असणार आहे.
टेस्लाचा पहिला उद्देश हिंदुस्थानात आपले बस्तान बसवणे हे आहे. याकरता कंपनी भविष्यात हिंदुस्थानात टेस्ला कारखाना किंवा असेंब्ली युनिट उघडण्याचा विचारात आहे. कंपनीने हिंदुस्थानात कारखाना किंवा असेंब्ली युनिट उघडले तर, इलेक्ट्रिक वाहने देखील वेगाने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.