
सामना ऑनलाईन । मुंबई
शिवशक्ती महिला संघ आयोजित स्थानिक अ, ब, क आणि महिला व्यावसायिक गट साहेब चषक कबड्डी स्पर्धेत महिला गटात इमराल्ड इन्फोटेक संघाने साई सिक्युरिटी संघावर 26-25 अशी 1 गुणांनी चुरशीची मात करीत जेतेपदावर आपले नाव कोरले. पुरुष स्थानिक अ, ब आणि क गटांत अनुक्रमे जय भारत क्रीडा मंडळ, जय भारत क्रीडा मंडळ आणि सक्षम क्रीडा मंडळ संघांनी विजेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला. या स्पर्धेला दैनिक ‘सामना’ने विशेष सहकार्य केले होते.
शिवशक्ती महिला संघाने ना. म. जोशी मार्गावरील श्रमिक जिमखान्यात आयोजिलेल्या साहेब चषक कबड्डी स्पर्धेच्या व्यावसायिक महिला गटात सिमरन बुदतकरच्या अष्टपैलू खेळाच्या बळावर इमराल्ड इन्फोटेक संघाने साई डेकरीत्या संघावर 26-25 असा अटीतटीचा विजय मिळवत जेतेपद पटकावले. या गटात सिमरनने सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूचा बहुमान पटकावला, तर साई सिक्युरिटीची प्रणाली नागदेवता हिने सर्वोत्कृष्ट पकडीसाठी आणि बँक ऑफ बडोदाची पूजा यादव हिने सर्वोत्कृष्ट चढाईपटूसाठीचा बहुमान पटकावला. विजेत्या संघांना आमदार सुनील शिंदे, दैनिक ‘सामना’चे नॅशनल हेड (रिसर्च आणि मार्केट डेव्हलपमेंट) दीपक शिंदे, युवासेना संघटक संदीप वरखडे, शिवसेना शाखाप्रमुख गोपाळ खाडे, प्रकाश भोसले आणि राजन बारटक्के या मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे यशस्वी संयोजन श्री शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त कबड्डी संघटक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
स्पर्धेच्या पुरुष स्थानिक गट स्पर्धेत ‘अ’ गटात जय भारत क्रीडा मंडळाने शिवशक्ती क्रीडा मंडळ संघावर 38-31 अशी 7 गुणांनी मात करीत विजेतेपद पटकावले. ‘ब’ गटात विकास सेवा संघाने भवानीमाता संघावर 26-23 अशी 3 गुणांनी मात करीत विजेतेपद पटकावले. ‘क’ गटात सक्षम क्रीडा मंडळ संघाने जेतेपद पटकावले.
शिवशक्ती महिला संघाने श्रमिक जिमखान्यावर आयोजित केलेल्या स्थानिक पुरुष गट आणि व्यावसायिक महिला गट कबड्डी स्पर्धेत व्यावसायिक महिला गटाचे विजेतेपद पटकावणाऱया इमराल्ड इन्फोटेक संघाचे खेळाडू दैनिक ‘सामना’चे नॅशनल हेड (रिसर्च ऍण्ड मार्केट डेव्हलपमेंट) दीपक शिंदे यांच्या हस्ते जेतेपदाचा साहेब चषक स्वीकारताना. सोबत कबड्डी संघटक राजेश पाडावे व अन्य मान्यवर.




























































