मुंबई विमानतळावर इमर्जन्सी; पायलटच्या हुशारीने एअर अॅम्ब्युलन्सचा अपघात टळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालहून मुंबईला निघालेल्या एका चार्टर्ड विमानाच्या (एअर अॅम्ब्युलन्स) लँडींग गिअरमध्ये बिघाड झाल्याने मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर गुरूवारी रात्री मोठी ‘इमर्जन्सी’ जाहीर करण्यात आली आणि अग्निशमन दलासह सर्व यंत्रणांना सज्ज ठेवण्यात आले. अखेर या चार्टर्ड विमानाच्या वैमानिकाने मोठी हुशारी दाखवली. या विमानाचे सर्व इंधन आकाशात घिरटय़ा घालून संपवित त्याला सुखरूपपणे लँडींग करीत प्रवाशी रूग्णासह पाच जणांचे प्राण वाचविले.

जेट सर्व्ह एव्हीशनचे सी-90 व्हीटी-जेआयएल या बीच क्राफ्ट छोटेखानी विमानाने पश्चिम बंगालच्या बागडोगरा विमानतळाहून उड्डाण घेतलेल्या विमानाने नागपूरला इंधन हाल्ट घेत पुन्हा मुंबईसाठी उड्डाण घेतले. परंतू विमानाचे चाक बिघडल्याने ते उघडत नव्हते. त्यामुळे या विमानाचे मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडीग करण्याचे ठरले. त्यासाठी विमानतळावर अग्निशमन दलास सर्व यंत्रणांना कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहण्याचे आदेश दिले. या विमानात एक पेशंट, त्याचा नातेवाईक डॉक्टर आणि दोन क्रु मेंबर असे पाच जण होते. बेली लँडिंग म्हणजेच चाकाशिवाय विमानाला पोटावरच लँडिंग करताना विमानाचा स्फोट होण्याची शक्यता होती. त्यामुळे वैमानिकाने विमान तास ते दीड तास हवेतच फिरवित सर्व इंधन संपविले. त्यानंतर रात्री 9.09 वाजता मुंबई विमानतळावर सुखरूपपणे उतरविण्यात आले. विमानाने पेट घेऊ नये म्हणून फोमचा वापर करीत धावपट्टी संपूर्ण ओली करण्यात आली होती. त्यानंतर हे लँडिंग झाले. विमानातील रूग्णास नानावटीत दाखल करण्यात आले आहे.