एअर इंडियाच्या विमानात आग; विमानाचे आपत्कालीन लँडिंग, सर्व प्रवासी सुखरूप

दिल्लीहून इंदूरला जाणारे एअर इंडियाचे फ्लाइट एआय 2913 टेकऑफ केल्यानंतर लगेचच दिल्लीला परतले. विमानाच्या कॉकपिट क्रूला उजव्या इंजिनमध्ये आग लागल्याचे संकेत मिळाले. त्यानंतर, इंजिन बंद करण्यात आले आणि विमान दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले. वैमानिकाच्या सतर्कतेमुळे अपघात टळला. विमान चौकशीसाठी ग्राउंड करण्यात आले आहे, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिली. प्रवाशांच्या सोयीसाठी पर्यायी विमान तत्काळ उपलब्ध करून देण्यात आले.

विमान हवेत असताना अलार्म वाजला आणि कॉकपिटमध्ये आगीचे संकेत मिळाले. विमानात बसलेल्या प्रवाशांमध्ये घबराट पसरली. परंतु वैमानिकाने तातडीने आवश्यक ती खबरदारी घेतली आणि इंजिन बंद करून विमान हवेत नियंत्रणात ठेवले, त्यानंतर वैमानिकाने दिल्ली विमानतळावर विमान सुरक्षितपणे उतरवले.