हिंगोलीत पेट्रोल पंपावर मुस्लिम टोळक्याचा धुडगूस; पोलिसांचा मात्र कानाडोळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । हिंगोली

हिंगोली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या चौधरी पेट्रोल पंपावर शुक्रवारी रात्री दहा वाजता उधार पेट्रोल का देत नाही या कारणावरून एका मुस्लिमाने वाद घातल्यावर थोड्याच वेळात जमलेल्या मुस्लिम टोळक्याने चांगलाच धुडगुस घातला. शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या पेट्रोल पंपावर हा गोंधळ झाल्यानंतर पोलिसांनी मात्र कानाडोळा केला. केवळ एकच पोलीस कर्मचारी पंपावर पोहोचल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तसेच शुक्रवारी घडलेल्या या घटनेची नोंद आज 13 जुलै रोजी सकाळी दहा वाजता पोलीस ठाण्यात अदखलपात्र स्वरूपात करण्यात आली. विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पोलिसांकडून घेतल्या गेलेल्या या संशयास्पद भूमिकेची चांगली चर्चा सुरू आहे.

हिंगोली ते नांदेड रस्त्यावर इंदिरा चौकात हिंगोली शहराच्या मध्यभागी चौधरी पेट्रोल पंप आहे. शुक्रवारी 11 जुलै रोजी रात्री दहा वाजता एक मुस्लिम युवक मोटरसायकल घेऊन पेट्रोल पंपावर आला व त्याने पैसे नाहीत उधारीवर पेट्रोल भरा, असे पंपावरील कर्मचाऱ्याला सांगितले. पंपावरील कर्मचाऱ्यांनी नकार देतात या मुस्लिम युवकाने वाद घातल्यास सुरुवात केली. त्यानंतर 100 ते 200 मुस्लिमांचा जमाव पेट्रोल पंपावर जमा झाला. पंपावरील अक्षय बजरंग भास्कर, रा. आण्णाभाऊ साठे नगर, हिंगोली याला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आली. या टोळक्याने पंपावर चांगलाच धुडगुस घातला. हिंगोली शहर पोलीस ठाण्यापासून चौधरी पेट्रोल पंप दीडशे ते दोनशे फुटाच्या अंतरावर आहे. पेट्रोल पंप चालक सुमित चौधरी यांनी पोलिसांना माहिती दिल्यावर एकच पोलीस कर्मचारी पंपावर आल्याचे सांगण्यात आले. या पोलीस कर्मचाऱ्याने गोंधळी टोळक्याला हुसकावून लावले.

दरम्यान, 11 जुलै रोजी या प्रकाराची फिर्याद देऊनही हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली नाही. सध्या अशोक घोरबांड नावाचे पोलीस निरीक्षक हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आहेत. अक्षय भारस्कर या जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयातील एमएलसी जबाबावरून आज 13 जुलै रोजी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान शहर पोलीस ठाण्यात मोसिन, समीर, मान्या अशा तिघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून या तिघांची पूर्ण नावे माहित नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल हे हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी जिल्ह्यामध्ये असताना पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यासाठी झालेल्या टाळाटाळीमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणात पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेविषयी आश्चर्य व्यक्त केले जात असून मुस्लिम टोळक्याने घातलेल्या धुडगूसाला पाठीशी घालण्याचे कारण काय असा सवाल उपस्थित होत आहे.