शनिवार, रविवार आला तरी नोकरीत ‘ब्रेक’ नाही! नोकरी बदलणाऱ्यांना दिलासा, ईपीएफओने केला महत्त्वाचा बदल

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ईपीएफओने नुकताच एक महत्त्वाचा बदल करून लाखो कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा दिला आहे. त्यानुसार एक नोकरी सोडून दुसऱ्या नोकरीत रूजू होताना शनिवार, रविवार किंवा घोषित सुट्टय़ा आल्या की, त्याला सर्व्हिसमधील ‘ब्रेक’ मानला जाणार नाही.

ईपीएफओने स्पष्ट केले की, एखाद्या कर्मचाऱ्याने शुक्रवारी नोकरी सोडली आणि सोमवारी दुसऱ्या नोकरीत रुजू झाला तर मधल्या शनिवार आणि रविवारला सेवा खंड मानला जाणार नाही. त्याचप्रमाणे साप्ताहिक सुट्टय़ा, राष्ट्रीय सुट्टय़ा, राजपत्रित सुट्टय़ा, राज्य सरकारी सुट्टय़ा आणि मर्यादित सुट्टय़ादेखील सर्व्हिसमधील ब्रेक मानला जाणार नाही.

 नवीन परिपत्रकानुसार, ईपीएफओने कर्मचारी ठेवीशी संलग्न विमा म्हणजे ईडीएलआय योजनेसाठीचे नियम अधिक व्यावहारिक केले आहेत, ज्याचा थेट फायदा अशा कुटुंबांना होईल ज्यांच्या मृत्यूच्या दाव्यांना पूर्वी किरकोळ तांत्रिक समस्यांमुळे किंवा नोकरीतील किरकोळ बदलांमुळे विलंब किंवा नकार सहन करावा लागला होता.