ईपीएफओने नवीन आर्थिक वर्षांत वाढवला व्याज दर, वाचा बातमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोट्यवधी कर्मचाऱ्यांकडून निवृत्तीनंतर भाविष्याचा आधार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘ईपीएफओ’ने आर्थिक पत घसरलेल्या अदानी उद्योग समूहात गुंतवणूक केल्याच्या वृत्ताने सोमवारी एकच खळबळ उडाली. आता, मंगळवारी ईपीएफओने सुमारे सहा कोटी खातेधारकांना दिलासादायक अशी माहिती दिली आहे. ईपीएफवर जमा असलेल्या रकमेवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे.

2022-23 या आर्थिक वर्षासाठी ईपीएफओने 8.15 टक्के इतका व्याजदर असल्याची घोषणा केली आहे. या व्याजदरातील वाढीचा फायदा सुमारे सहा कोटी खातेधारकांना होणार आहे. त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षासाठी म्हणजेच 2021-22मध्ये ईपीएफनेवरील व्याजदर घटवून तो 8.1 टक्के इतका करण्यात आला होता. मात्र आता तो वाढवण्यात आला आहे.

2021-22 या आर्थिक वर्षासाठीचा पीएफवरील व्याजदर हा गेल्या 40 वर्षांतील सर्वात कमी व्याजदर आहे. 1977-78मध्ये ईपीएफओने 8 टक्क्यांचा व्याजदर निश्चित केला होता. त्यानंतर सातत्याने या व्याजदाराचा आकडा 8.25 किंवा त्याहून अधिक होता. आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये 8.65 टक्के, 2017-18 मध्ये 8.55 टक्के, 2016-17 मध्ये 8.65 टक्के आणि आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये 8.8 टक्के इतका व्याजदर लागू करण्यात आला होता.