राज्यात वकील संरक्षण कायदा लागू करा; हायकोर्टात जनहित याचिका दाखल

नगर जिह्यातील राहुरी येथे वकील दाम्पत्याची झालेली हत्या व त्या घटनेच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढणाऱया वकिलांवर पोलिसांनी केलेला लाठीमार या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. राज्यात वकील संरक्षण कायदा तातडीने लागू करण्याबाबत सरकारला निर्देश द्या, अशी विनंती याचिकेतून करण्यात आली आहे.

माहीम येथील रहिवासी असलेले ऍड. नितीन सातपुते यांनी ऍड. शोभा बुद्धिवंत यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेमध्ये मिंधे सरकारसह केंद्र सरकार, मुंबईचे पोलीस आयुक्त, बार कौन्सिल ऑफ इंडिया तसेच राज्य आणि केंद्राच्या विधी व न्याय विभागाला प्रतिवादी बनवले आहे. 27 जानेवारी रोजी राहुरी येथील राजाराम आढाव आणि त्यांच्या पत्नी मनीषा आढाव या वकील दाम्पत्याचे अपहरण करण्यात आले. तसेच पाच लाखांची खंडणी मागत पाच जणांनी हत्या केली. या घटनेने वकिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला. याच पार्श्वभूमीवर 2 फेब्रुवारीला मुंबई व राज्यभरातील हजारो वकिलांनी आझाद मैदानात धडक दिली आणि हत्येच्या निषेधार्थ शांततेच्या मार्गाने निदर्शने केली. बार असोसिएशनच्या सदस्यांनी ही निदर्शने करीत महाराष्ट्र वकील संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीची मागणी केली. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांसह जवळपास 500 पोलिसांचा फौजफाटा आझाद मैदानावर धडकला आणि मैदानाभोवती बॅरिकेड्स उभे करून वकिलांना बेकायदेशीररीत्या ताब्यात घेण्यात आले. तसेच लाठीमार केल्याने काही वकील जखमी झाले. याप्रकरणी जबाबदार पोलीस अधिकाऱयांवर फौजदारी कारवाईचे निर्देश द्या, अशी विनंती याचिकेतून केली आहे.