एटीएसच्या पथकात दया नायक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दयानंद नायक यांची महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकात बदली करण्यात आली असून चकमकफेम पोलीस अधिकारी म्हणून ओळखल्या जाणार्‍या या धडाडीच्या अधिकार्‍याची ‘एटीएस’मध्ये नियुक्ती झाल्याने ‘एटीएस’ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

दया नायक यांनी प्रदीप शर्मा यांच्या पथकात असताना 100 च्या वर चकमकीत भाग घेतला आहे. त्यांच्याकडे खबर्‍यांचे आजही मजबूत जाळे आहे. दया नायक यांनी अनेक गुंतागुंतीच्या केसेसवर प्रकाश टाकला आहे. आता अतिरेकी कारवाया हाणून पाडण्यासाठी दया नायक यांना आपल्या जुन्या खबर्‍यांचा उपयोग होणार आहे, अशीही माहिती सूत्रांनी दिली. मुंबईत बॉम्बस्फोट करण्यासाठी आलेल्या काही पाकिस्तानी अतिरेक्यांनाही दया नायक यांनी कंठस्नान घातले आहे, तर काठमांडू येथून इंडियन एअरलाइन्सच्या प्रवासी विमानाचे अपहरण करणार्‍या पाकिस्तानी अतिरेक्यांच्या साथीदारांना मुंबईतील जोगेश्वरी बेहरामबाग येथून पकडण्यात आले होते. त्यावेळी नायक यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती.