उरण तालुक्यातील नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमण, महसूल विभागाचे दुर्लक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
photo pratinidhik

न्हावाशेवा, राजकुमार भगत

उरण तालुक्यातील औद्योगिकरण झपाट्याने वाढत आहे. अशा वाढत्या औद्योगिकीकरणाचा गैरफायदा घेत भांडवलदार, कंटेनर यार्डचे मालक व बांधकाम व्यावसायिकांनी चक्क आपल्या फायद्यासाठी तालुक्यातील नैसर्गिक नाल्यावर, खाडीकिनाऱ्यावर अतिक्रमण करण्यास सुरुवात केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. एकंदरीत पावसाळी नैसर्गिक पाणी वाहून जाणारे नैसर्गिक नाले, खाडीकिनारे दगड मातीच्या भरावात बूजवले असल्याने भविष्यात उरण पाण्या खाली जाणार अशी म्हणण्याची वेळ येथील रहिवाशांवर आली आहे.

उरण तालुक्यात केंद्र आणि राज्य सरकारचे ओएनजीसी, भारत गॅस, महावितरण प्रकल्प, नौदलाचे शस्त्रागार, जेएनपीटी सारखे इतर बंदर प्रकल्प आहेत. अशा वाढत्या औद्योगिकीकरणामुळे नागरीकरण ही झपाट्याने वाढत आहे. त्यात काही भांडवलदारांनी, बांधकाम व्यावसायिकांनी, कंटेनर यार्डच्या मालकांनी, आपल्या फायद्यासाठी विंधने, चाणजे, म्हातवली वेश्वी, दिघोडे, बांधपाडा चिर्ले, जासई, धुतूम, फुंडे, सोनारी, नवघर सारख्या इतर ग्रामपंचायत हद्दीतील नैसर्गिक पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यावर, खाडीकिनाऱ्यावर दगड व मातीचा भराव टाकून सदरचे नाले, खाडीचा भाग गिळंकृत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

नाल्यावर व खाडीकिनाऱ्यावर होणाऱ्या दगड, मातीच्या भरावामुळे आणि वाढत्या अतिक्रमणामुळे या परिसरातील नाल्यांची, खाडीकिनाऱ्याची रूंदी कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात या परिसरातील पुराचे पाणी रहिवाशांच्या घरात शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. याचे गांभीर्य ओळखून रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वैजनाथ ठाकूर, उरण तालुक्यातील सामाजिक संघटना, स्थानिक रहिवासी यांनी यासंदर्भात वारंवार आपल्या परिसरात होणाऱ्या नाल्यावरील, खाडीकिनाऱ्यावरील अतिक्रमणा संदर्भात उरण तहसिल कार्यालय,उरणची आमसभा येथे तक्रार करून आवाज उठविण्याचा प्रयत्न केला.

परंतु अशा अतिक्रमणांना स्थानिक ग्रामपंचायत, उरण तालुक्यातील महसूल अधिकारी यांनी अभय देण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. त्यामुळे आज तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत हद्दीतील नैसर्गिक नाल्यावर व खाडीकिनाऱ्यावर अतिक्रमण झपाट्याने वाढत आहे. तरी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वाढत्या अतिक्रमणाकडे असेच दुर्लक्ष केले तर भविष्यात उरण तालुक्यातील पावसाळी पाणी वाहून नेणारे नाले, खाडीकिनारे बुजून येथील पावसाली पुराचे पाणी गावोगावच्या रहिवाशांच्या घरात शिरल्या शिवाय राहणार नाही अशी भिती रहिवाशी व्यक्त करीत आहेत.

तरी उरण तहसिलदार कल्पना गोडे यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत हद्दीतील नैसर्गिक नाल्यांचा, खाडीकिनाऱ्याचे सर्वेक्षण करून सदरच्या अतिक्रमणांना अभय न देता कारवाईचा बडगा उगारावा अशी मागणी आता उरणचे रहिवासी करीत आहेत.