चाणजे परिसरात शासकीय जागेवर कब्जा करून विक्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सूर्यकांत म्हात्रे, चिरनेर

चाणजे परिसरातील शासकीय जागेवर काहींनी कब्जा करून त्याची सरळ सरळ लाखो रुपयांना विक्री केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या जागांवरील बांधकांमाना ग्रामपंचायतीने घर नंबरही दिले आहेत. तरी अशा शासकीय जागेवर कब्जा करून त्याची विक्री करणाऱ्या भूमाफियांची चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

चाणजे परिसरात सिडको, वन विभाग व मेरिटाईम बोर्ड यांच्या जागा आहेत. त्यातील बहुतांश जागा या येथील धनदांडग्यांनी संबधित खात्याच्या अधिकारी वर्गाला हाताशी धरून आपल्या कब्जात घेतल्या आहेत. त्यानंतर त्या जागांवर बांधकाम करून त्याची सरळ सरळ लाखों रुपयांना विक्री करून मोकळे झाले आहेत. याबाबत काहींनी संबधित खात्याकडे तक्रारी करून कारवाईची मागणी केली असता. आम्ही चौकशी करून कारवाई करू असे थातुरमातुर उत्तर नेहमीच देत असतात. परंतु अशाबाबतची कोणतीच कारवाई झाल्याचे व यापुढे होईल असे वाटत नाही.

शासकीय जागेवर कब्जा करणारे भूमाफिया व संबधित काही अधिकारी वर्ग यांचे नेहमीच आर्थिक घट्ट मैत्री असल्याचे चित्र सर्रास पहावयास मिळते. त्यामुळे या भूमाफियांवर कारवाई होणे दूरच रहाते. अधिकारी वर्ग दोन ते तीन वर्षे एखाद्या ठिकाणी काम करून नंतर बदली होऊन जाते. पुन्हा नवीन येणार अधिकारी पुन्हा नव्याने एबीसीडी सुरू करतो. त्यामुळे कारवाई करणे शक्य होत नाही. याचाच फायदा भूमाफियांनी उठवत चाणजे परिसरातील शासकीय जागा आपल्याच मालकीच्या असल्याच्या थाटात बांधकाम करून त्यांची विक्री करून मोकळे होत आहेत. यामध्ये काही ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश असल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला असल्याचे समजते.

याबाबत ग्रामपंचायतीचे ग्रामविस्तार अधिकारी अमित तपकिरे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी याला दुजोरा दिला. ग्रामपंचायतीने घर नंबर दिले असले तरी त्यांना आपण अनधिकृत म्हणून शिक्का मारूनच घरपट्टी घेत असल्याचे त्यांनी सांगितले. तरी चाणजे परिसरात सिडको, वनविभाग व मेरिटाईम बोर्डाने आपली जागेचे सर्वेक्षण करून त्याठिकाणी अधिकृत बोर्ड किंवा कंपाऊंड घालावा जेणेकरून कोणी अज्ञात व्यक्ती त्यावर कब्जा करणार नाही. चाणजे परिसरात शासकीय जागेवर ज्यांनी ज्यांनी कब्जा करू त्याची विक्री केली आहे. त्यांची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी. तसेच संबधित भूमाफियांना पाठीशी घालणाऱ्या शासकीय अधिकारी वर्गावरही कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

ग्रामपंचायतीने घर नंबर दिले असले तरी त्यांना आपण अनधिकृत म्हणून शिक्का मारूनच घरपट्टी घेत आहोत.
अमित तपकीरे, ग्रामविस्तार अधिकारी, चाणजे ग्रामपंचायत