
राज्यातील महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यांमधील वीज कामगार उद्या सोमवारपासून आपल्या विविध मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलन करणार आहेत. मात्र या आंदोलनादरम्यान वीजनिर्मिती आणि वीज वितरणामध्ये कोणतीही बाधा येणार नाही याबाबत विशेष खबरदारी घेतली जाणार असल्याचे वीज कामगार, अभियंते संघटना संयुक्त कृती समितीने स्पष्ट केले आहे.
कोरोना महामारीच्या संकटकाळात वीज कामगार, अभियंते आपला जीव धोक्यात घालून अखंडित वीजपुरवठा करत आहेत, पण त्यांना सरकारने अद्याप फ्रंटलाइन वर्कर्सचा दर्जा दिलेला नाही. संपूर्ण कर्मचारी आणि कुटुंबातील सदस्यांचे लसीकरण केलेले नाही, वीज कर्मचाऱयांसोबत चर्चा न करता मेडिक्लेम पॉलिसीचा टीपीए परस्पर बदलला आहे. मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांना 50 लाख रुपयांऐवजी 30 लाख रुपये सानुग्रह अनुदान दिले जात आहे. थकीत वीज बिलाच्या वसुलीबाबत कर्मचाऱयांवर सक्ती केली जात आहे. याच्या निषेधाबरोबरच सरकारचे आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ‘काम बंद’ आंदोलन करण्यात येणार आहे.
ही कामे थांबणार…
वीज कामगार काम बंद आंदोलन करणार असले तरी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वीजनिर्मिती आणि वीज वितरणासह अत्यावश्यक सेवेत येत असलेली कामे सुरूच राहणार आहेत. तर अत्यावश्यक सेवेत नसलेली कार्यालयीन कामे, सर्व प्रकारची दुरुस्ती आदी कामे थांबवण्यात येणार आहेत.



























































