सदानंद कदम यांना ईडीकडून अटक, राजकीय सूडबुद्धीने कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sadanand kadam

दापोलीमधील साई रिसोर्टचे मालक, उद्योजक सदानंद कदम यांना आज पहाटे ‘ईडी’ने अटक केली. खेड येथील उद्धव ठाकरे यांची सभा यशस्वी करण्यासाठी कदम यांचा सक्रिय सहभाग होता. त्यामुळेच कदम यांची अटक म्हणजे राजकीय सूडबुद्धीने केलेली कारवाई असल्याचे उघड झाले आहे.

‘ईडी’चे पथक आज पहाटे उद्योजक कदम यांच्या कुडोशी येथील फार्महाऊसवर गेले आणि त्यांची तासभर चौकशी केली. त्यानंतर त्यांना अटक केली. विशेष म्हणजे या अटक कारवाईचे वृत्त ‘ईडी’ने नव्हे, तर भाजपचे किरीट सोमय्या यांनी ट्विटरवरून सर्वप्रथम जाहीर केले. त्यामुळे या कारवाईमागील ‘राजकीय’ संशय अधिकच बळावला आहे. कदम यांच्यावर काही दिवसांपूर्वीच खेडमधील एका रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली आहे. ते फार्महाऊसवर आराम करत होते. तरीही ‘ईडी’ने त्यांना अटक केल्याने त्याचीही चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 5 मार्च रोजी येथील गोळीबार मैदानात विराट गर्दीची सभा झाली आणि त्यामुळे मिंधे गटासह भाजपचेही धाबे दणाणले. या सभेच्या आयोजनात सदानंद कदम यांचा मोठा पुढाकार होता. त्यामुळे त्यांना झालेली अटक हा राजकीय सूड असल्याचा आरोप होत आहे.

दरम्यान, माजी आमदार संजय कदम यांनी या कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला असून शिंदे गटाचे काही नेते सूडबुद्धीने कारवाई घडवून आणण्याचे काम करत असल्याचे म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतरच ही कारवाई झाली याकडेही कदम यांनी लक्ष वेधले आहे.