जमिनीच्या बदल्यात नोकरी घोटाळा, तेजस्वी यादव यांची ईडी चौकशी

जमिनीच्या बदल्यात नोकरी या कथित घोटाळ्या प्रकरणी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची ईडी कार्यालयात चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीसाठी यादव यांना समन्स पाठवण्यात आलं होतं आणि त्यानुसार ते कार्यालयात मंगळवारी सकाळी हजर झाले. 19 जानेवारी रोजी ईडीने तेजस्वी यांना समन्स पाठवले होते. 30 जानेवारीला त्यांना ईडी कार्यालयात हजर होण्यास सांगितले होते. यापूर्वी ईडीने तेजस्वी यादव यांचे वडील लालू प्रसाद यादव यांची याच प्रकरणात सोमवारी चौकशी केली होती.

नितीश कुमार रंग बदलणारा सरडा

जर माझ्या वडिलांना काही झाले तर माझ्यासारखे वाईट कुणीही नसेल. याची संपूर्ण जबाबदारी सरडय़ासारखे रंग बदलणारे आणि सीबीआय तसेच ईडीची असेल अशी टीका रोहिणी आचार्य यांनी नितीश कुमार यांचे नाव न घेता केली. सोमवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी संताप व्यक्त केला. शेर एकटा आहे, कमजोर नाही असेही त्या म्हणाल्या. तसेच नितीश कुमार यांच्यावर मला सुरुवातीपासूनच जराही विश्वास नव्हता. ते एनडीएसोबत जाणार हे आम्हाला माहीत होते, असेही त्यांनी सांगितले. नितीश कुमार यांची एनडीएशी युती करण्याबद्दल राज्यसभा खासदार मिसा भारती यांना विचारले असता नितीश कुमार यांनाच विचारा, मला याबद्दल काहीच बोलायचे नाही, असे उत्तर मिसा भारती यांनी दिले. दरम्यान, 19 जानेवारी रोजी ईडीने लालू प्रसाद यादव आणि त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांना समन्स बजावले होते.