
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती उद्योजक रॉबर्ट वाड्रा यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. नवी दिल्लीतील ईडीच्या मुख्यालयात वाड्रा यांची चौकशी करण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी 10.30 वाजता त्यांना मुख्यालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाड्रा यांच्यावर 19 लाख पाऊंडची परदेशी संपत्ती अवैधप्रकारे जमवणे, करचोरी असे आरोप ठेवण्यात आले आहेत. लंडनमधील 12 ब्रायंस्टन स्क्वेअर येथे 19 लाख पाऊंडची संपत्ती बेनामी संस्थाद्वारे खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दिल्लीतील एका न्यायलयाने वाड्रा यांना सशर्त अंतरिम जामीन मंजूर केला आहे. पाच लाख रुपयांच्या वैयक्तीक जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाऊ नये, या अटीवर त्यांना जामीन देण्यात आला आहे. चौकशीत सहकार्य करावे, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करू नये आणि साक्षीदारांवर दबाव टाकू नये अशा सूचनाही वाड्रा यांना करण्यात आल्या आहेत. ईडीने वाड्रा यांच्या जामीनाला आक्षेप घेतला होता. वाड्रा यांची चौकशी करायची आहे. आपल्याकडे वाड्रा यांच्याविरोधात सबळ पुरावे आहेत. हे आर्थिक गैव्यवहाराचे गंभीर प्रकरण आहे, त्यामुळे त्यांना जामीन देण्यात येऊ नये असे ईडीचे म्हणणे होते. अंतरिम जामीनासाठी वाड्रा यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने त्यांना अटकेपासून तात्पुरते संरक्षण दिले आहे. आता वाड्रा यांची चौकशी करण्यासाठी ईडीने त्यांना समन्स बजावले आहे. ईडीच्या मुख्यालयात गुरुवारी वाड्रा यांची चौकशी होणार आहे.

























































