
रोजच ‘मरे’ची सेवा कोलमडत असल्याने चाकरमानी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. आज सकाळी सलग दुसऱ्या दिवशी अंबरनाथ – बदलापूरदरम्यान मालगाडीचे इंजिन फेल झाल्याने ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. सकाळी 6 वाजल्यापासून मुंबईच्या दिशेने होणारी वाहतूक सेवा ठप्प झाल्याने कर्जत ते अंबरनाथदरम्यानच्या स्थानकांवरून कामावर निघालेल्या चाकरमान्यांचा दीड तास खोळंबा झाला.
गुरुवारी दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास टिटवाळा – आंबिवलीदरम्यान मालगाडीचे इंजिन बिघडल्याने मुंबईच्या दिशेने होणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. या नादुरुस्त इंजिनमुळे वाहतूक तब्बल दोन तास ठप्प झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. या घटनेला 24 तास उलटण्याआधीच आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा ‘मरे’ सेवा कोलमडली आणि मुंबईकडे होणारी वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे कर्जत, नेरळ, वांगणी, बदलापूर, अंबरनाथ येथून दररोज अपडाऊन करणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच गोची झाली. उशिरा पोहोचल्याने त्यांना लेटमार्कही लागला.
दोन लोकल रद्द
रेल्वे कर्मचाऱ्यांनी इंजिनच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केल्यानंतर दीड तासानी रेल्वे सेवा पूर्वपदावर आली. मात्र त्यानंतरही काही काळ रेल्वे उशिराने धावत होत्या. यावेळी सर्व रेल्वे स्थानकांवर तुडुंब गर्दी झालेली पाहायला मिळाली. दरम्यान कर्जतहून मुंबईकडे जाणाऱ्या दोन लोकल रद्द करण्यात आल्या. यावेळी अमरावती एक्स्प्रेस बदलापूर स्थानकात थांबवण्यात आल्याने नोकरदार वर्गाला दिलासा मिळाला मात्र एक्स्प्रेसमधील प्रवाशांची तासन्तास लटकंती झाली.