‘वर्क फ्रॉम होम’च्या तणावाने इंजिनिअरची गळफास घेत आत्महत्या

कोरोना महामारीमुळे अनेक समस्यांमध्ये भर पडली आहे. या संकटात अनेकांचे रोजगार गेल्याने त्यांच्यासमोर उपजीविकेचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे, तर अनेकांची पगारकपात झाल्याने जमाखर्चाचा मेळ घालण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. अशा परिस्थितीत आहे ती नोकरी टिकवण्यासाठी प्रत्येकाची खटपट सुरू आहे. यात अनेकजण घरातून म्हणजे वर्क फ्रॉम होम करत आहे. वर्क फ्रॉम होमचा तणाव सहन न झाल्याने गुजरातमधील एका इंजिनिअरने गळफास घेत आत्महत्या केली आहे.

जिगर गांधी असे आत्महत्या केलेल्या इंजिनिअरचे नाव आहे. तो गुजराच्या अदाजन परिसरात राहत होता. मंगळवारी त्याच्या खोलीत त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याने आत्महत्या केल्याने कटुंबियांना धक्का बसला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचत तपासाला सुरुवात केली आहे. वर्क फ्रॉम होमच्या तणावामुळे जिगरने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.

नोएडातील एका कंपनीत गेल्या तीन वर्षांपासून तो काम करत होता. कोरोनाच्या संकटामुळे दोन महिन्यांपूर्वी तो घरी परतला होता. त्याने घरातून काम करण्यास सुरुवात केली होती. वर्क फ्रॉम होममुळे येणाऱ्या अडचणी, कामाचा ताण, घरातील वातावरणात काम करण्यास होणारी असुविधा, साधनसामग्रीचा अभाव यामुळे काम करण्यास त्याला अडचणी येत होत्या. त्यामुळे कामाच्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे त्याच्या कटुंबियांनी सांगितले.

वर्क फ्रॉम होममुळे जिगर तणावात होता, असे त्याचे वडील बन्सीलाल यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी त्याने कामाच्या तणावाबाबत आणि वर्क फ्रॉम होममुळे येणाऱ्या अडचणीबाबत माहिती दिली होती, असे ते म्हणाले. मात्र, या तणावातून तो आत्महत्या करेल, असे वाटले नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले. सोमवारी त्याने चुलत भावाला फोन करून सुटीच्या दिवशी गप्पागोष्टी करण्यासाठी एकत्र येण्याचे ठरवले होते. मात्र, मंगळवारी त्याने आत्महत्या केल्याने सगळ्यांना धक्का बसला आहे.

जिगरचा डिसेंबर महिन्यात साखरपुडा होणार होता., असेही त्याच्या कटुंबियांनी सांगितले. पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. शवविच्छेदन अहलावात त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या