
सामना प्रतिनिधी । पुणे
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील जगज्जेतेपदाच्या झळाळत्या करंडकावर नाव कोरणे हे प्रत्येक संघाचे स्वप्न असते, मात्र क्रिकेटचा जन्मदाता असलेल्या इंग्लंडला क्षमता असूनही दुर्दैवाने आजपर्यंत या करंडकाने हुलकावणी दिलेली आहे. याचबरोबर प्रत्येक विश्वचषक स्पर्धेत चोकर्स ठरल्याने दहशत असूनही दक्षिण आफ्रिकेचे जगज्जेतेपदाचे स्वप्न अधुरेच राहिले. शिवाय अनेकदा जेतेपदाचे प्रबळ दावेदार असतानाही न्यूझीलंडला अद्यापी विश्वकरंडकला मिठी मारता आलेली नाही. यावेळी यजमान इंग्लंडला जेतेपदाच्या शर्यतीत सर्वाधिक पसंती आहे. हिंदुस्थान व ऑस्ट्रेलिया यांच्याकडेही जेतेपदाचे प्रबळ दावेदार म्हणून बघितले जात आहे. त्यामुळे 12 व्या विश्वचषक स्पर्धेत क्रिकेटविश्वाला नवा जगज्जेता मिळणार की हिंदुस्थान तिसर्यांदा या चषकावर आपले नाव कोणार किंवा कांगारू जेतेपदाचा षटकार ठोकणार याकडे तमाम क्रिकेटरसिकांच्या नजरा असणार आहेत.
इंग्लंडला सन 1979, 1987 व 1992 मध्ये अंतिम फेरीत धडक मारूनही प्रत्येक वेळी उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. सर्वाधिक चार वेळा क्रिकेटच्या या कुंभमेळ्याचे यशस्वी आयोजन करूनही एकही कर्णधार इंग्लंडला जगज्जेता बनवू शकला नाही अन् हीच सल गोर्या साहेबांच्या मनात काळ्या काट्याप्रमाणे पाचव्यांदा या सर्वोच्च स्पर्धेचे आयोजन करताना बोचत आहे. 1975च्या विश्वचषक स्पर्धेत यजमान इंग्लंडला उपांत्य फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. तेथे ऑस्ट्रेलियाने त्यांना हरवले. पुढच्याच विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने अंतिम फेरीत धडक दिली, मात्र त्यावेळी क्रिकेटविश्वावर अधिराज्य गाजविणार्या वेस्ट इंडीजने त्यांचा जगज्जेतेपदाचा स्वप्नभंग केला. 1983 च्या विश्वचषक स्पर्धेतही याच विंडीजने इंग्लंडला उपांत्य फेरीत बॅगा भरायला लावल्या. 1987 मध्ये तर अवघ्या 7 धावांनी इंग्लंडला जगज्जेतेपदाने हुलकावणी दिली, मात्र त्यावेळी किताबी लढतीत ऑस्ट्रेलियाने त्यांचे स्वप्न धुळीस मिळवले. तंत्रशुद्ध आणि काटेकोर व्यूहरचनेने क्रिकेट खेळणार्या इंग्लंडने 1992 मध्ये पुन्हा एकदा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली, मात्र या स्पर्धेत ‘फिनिक्स भरारी’ घेणार्या इम्रान खानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानने किताबी लढतीत 22 धावांनी विजय मिळवून पुन्हा एकदा इंग्लंडला जगज्जेतेपदापासून दूर ठेवले. यानंतर इंग्लंडचा संघ विश्वचषक स्पर्धेत कधीच उपांत्य फेरीच्या पुढे जाऊ शकला नाही. त्यामुळे क्रिकेटचे जन्मजाते तब्बल 44 वर्षांच्या विश्वचषक इतिहासात जगज्जेतेपदाच्या प्रतीक्षेतच राहिले आहेत.
हम भी है रेस मे!
न्यूझीलंड या छोट्याशा देशात रग्बी हा सर्वात लोकप्रिय खेळ, तर दुसरी पसंती क्रिकेटला. या देशात आतापर्यंत अनेक महान क्रिकेटपटू होऊन गेले, मात्र जगज्जतेपदाचा मुकुट न्यूझीलंडला कधी जिंकता आला नाही. न्यूझीलंडने सहा वेळा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली, तर गतवर्षी अंतिम फेरीही गाठली होती. मात्र दक्षिण आफ्रिकेप्रमाणे हा संघही ऐनवेळी कच खात असल्याने कधी विश्वचषक जिंकू शकला नाही. गतवर्षी जेतेपदाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्याने न्यूझीलंडला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यावेळी केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडचा संघ जेतेपदाला गवसणी घालण्यासाठी सर्वस्व पणाला लावण्यासाठी सज्ज झालाय.




























































