इंग्लंडचे घवघवीत यश, दुसऱया कसोटीत श्रीलंकेवर सहा गडी राखून विजय

जो रूटच्या नेतृत्वात इंग्लंडच्या क्रिकेट संघाने सोमवारी यजमान श्रीलंकेला सहा गडी राखून पराभूत केले आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी महत्त्वाचे 60 गुण संपादन केले. इंग्लंडने या कसोटी मालिकेत 2-0 अशा फरकाने घवघवीत यश संपादन केले हे विशेष. जो रूट याची सामनावीर आणि मालिकावीर म्हणून निवड करण्यात आली.

श्रीलंकेच्या 381 धावांना प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा पहिला डाव 344 धावांवर आटोपला. श्रीलंकेच्या फलंदाजांना दुसऱया डावात अपेक्षाला साजेशी कामगिरी करता आली नाही. इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांपुढे श्रीलंकेच्या फलंदाजांची डाळ शिजली नाही. त्यांचा दुसरा डाव 126 धावांमध्येच गडगडला. डॉम बेसने 49 धावा देत चार फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. जॅक लीचने 59 धावा देत चार फलंदाजांना तंबूत पाठवले. जो रूटने दोन फलंदाज गारद केले. विजयासाठी आवश्यक असलेल्या 164 धावांचा पाठलाग करणाऱया इंग्लंडने चार गडी गमावत विजयी लक्ष्य ओलांडले. डॉम सिबलीने नाबाद 56 धावांची, जोस बटलरने नाबाद 46 धावांची खेळी साकारत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

दृष्टिक्षेपात

  • श्रीलंकेत 2012 सालापासून सलग सहा कसोटी जिंकणारा इंग्लंडचा संघ पहिला परदेशी संघ ठरला आहे. हिंदुस्थानी संघाने 2015 सालापासून सलग पाच सामने जिंकण्याची करामत केली आहे.
  • इंग्लंडने श्रीलंकेत चौथ्यांदा कसोटी मालिका विजय संपादन केला आहे. याआधी ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान यांनीही चार वेळा श्रीलंकेला श्रीलंकेत धूळ चारली आहे. हिंदुस्थानने तीन वेळा श्रीलंकेत मालिका विजय मिळवला आहे.

संक्षिप्त धावफलक

श्रीलंका पहिला डाव – 381 धावा; इंग्लंड पहिला डाव – 344 धावा; श्रीलंका दुसरा डाव – 126 धावा; इंग्लंड दुसरा डाव – 4 बाद 164 धावा

आपली प्रतिक्रिया द्या