इंग्लंडचा मालिका विजय, प्लेअर ऑफ दी मॅच जॉनी बेअरस्टॉ

633

डेव्हिड विलीची अष्टपैलू चमक… जॉनी बेअरस्टॉ, सॅम बिलिंग्सची दमदार फलंदाजी… अन् अदिल रशीदसह सर्व गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडने शनिवारी मध्यरात्री झालेल्या दुसऱ्या वन डे लढतीत आयर्लंडवर चार गडी राखून विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. अवघ्या 41 चेंडूंत दोन खणखणीत षटकार व 14 दमदार चौकारांसह 82 धावांची खेळी साकारणाऱया जॉनी बेअरस्टॉची प्लेअर ऑफ दी मॅच म्हणून निवड करण्यात आली.

आयर्लंडकडून इंग्लंडसमोर 213 धावांचे आव्हान ठेवण्यात आले. इंग्लंडने 32.3 षटकांत सहा गडी गमावत हे लक्ष्य ओलांडले. सलामीवीर जॉनी बेअरस्टॉने 41 चेंडूंत 82 धावांची स्फोटक खेळी करताना आयर्लंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. सॅम बिलिंग्सने 61 चेंडूंत नाबाद 46 धावांची आणि डेव्हिड विलीने 46 चेंडूंत नाबाद 47 धावांची खेळी करीत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

दरम्यान, याआधी आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण कुर्टिस कॅम्फेरच्या 68 धावा वगळता आयर्लंडच्या एकाही फलंदाजाला इंग्लंडच्या गोलंदाजांचे आव्हान समर्थपणे थोपवून लावता आले नाही. अदिल रशीदने 34 धावा देत तीन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. डेव्हिड विली व एस. महमूद यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. आर. टॉपले व जे. विन्स यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. आयर्लंडला 9 बाद 212 धावाच उभारता आल्या.

आपली प्रतिक्रिया द्या