इंग्लंडचा विजयी स्ट्रोक्स! कांगारूंवर रोमहर्षक विजय

330

359 धावांचा पाठलाग करताना 9 बाद 286 धावा अशा संकटात असताना बेन स्टोक्स नावाचा तारणहार यजमान इंग्लंडच्या मदतीला धावून आला. त्याने दहाव्या विकेटसाठी जॅक लीचसोबत 76 धावांची अभेद्य भागीदारी रचताना इंग्लंडला येथे पार पडलेल्या तिसऱया कसोटीत ऑस्ट्रेलियावर एक गडी राखून रोमहर्षक विजय मिळवून दिला आणि पाच सामन्यांच्या अॅशेस मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधून दिली.

इंग्लंडने तीन बाद 256 धावसंख्येवरून रविवारी पुढे खेळायला सुरुवात केली. पण जोश हॅझलवूड, जेम्स पॅट्टीनसन आणि नॅथन लायन यांनी प्रभावी गोलंदाजी करताना इंग्लंडचा पाय खोलात नेला. नॅथन लायनने कर्णधार जो रूटला 77 धावांवर बाद केले. त्यानंतर जॉनी बेअरस्टॉ (36 धावा), जोस बटलर (1 धाव), ख्रिस वोक्स (1 धाव), जोफ्रा आर्चर (15 धावा), स्टुअर्ट ब्रॉड (0) यांनी निराशा केली.

अखेरच्या जोडीची कमाल
बेन स्टोक्सच्या शानदार खेळीच्या जोरावर इंग्लंडने पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकण्याचा करिष्मा केला होता. त्याच बेन स्टोक्सने रविवारी आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी करताना इंग्लंडला ऍशेस मालिकेत बरोबरी साधून दिली. त्याने 219 चेंडूंत आठ खणखणीत षटकार व 11 दमदार चौकारांसह नाबाद 135 धावा फटकावल्या. अखेरच्या विकेटसाठी त्याने जॅक लीचसोबत 76 धावांची मौल्यवान भागीदारी केली. यात जॅक लीचचा वाटा होता फक्त एका धावेचा.

आपली प्रतिक्रिया द्या