
सामना ऑनलाईन । बर्मिंगहॅम
‘टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहलीच्या जिगरबाज खेळाला अखेर यशाचे कोंदण लाभले नाही. त्याने दिलेली शर्थीची झुंज अखेर अपयशी ठरली. इंग्लंडविरुद्धच्या बर्मिंगहॅममधील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात हिंदुस्थानी गोलंदाज पास झाले, मात्र कोहली सोडला तर इतर सर्व फलंदाज नापास झाले. यजमान इंग्लंडने चौथ्या दिवशी टिच्चून गोलंदाजी करत हिंदुस्थानच्या तोंडातील विजय अक्षरशः हिरावून नेला अन् कारकीर्दीतील एक हजाराव्या कसोटी सामन्यात ३१ धावांनी संस्मरणीय विजय मिळविला. ‘कोहली जिंकला अन् हिंदुस्थान हरला’ असेच या लढतीचे वर्णन करावे लागेल. यजमानांनी या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पहिल्या डावात ६ बळी टिपणारा अष्टपैलू सॅम करन सामन्याचा मानकरी ठरला.
ENGLAND WIN BY 31 RUNS!
What an effort from Ben Stokes, who finishes with 4/40, including the absolutely vital wicket of Virat Kohli this morning.
An absolutely amazing Test match!#ENGvIND SCORE https://t.co/jre8L0pd2t pic.twitter.com/JsZY7GM0US
— ICC (@ICC) August 4, 2018
हिंदुस्थान-इंग्लंडदरम्यानच्या बर्मिंगहॅम कसोटीतील चारही दिवस नाट्यमय ठरले. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करताना २८७ धावा करणार्या इंग्लंडने हिंदुस्थानला २७६ धावांवर रोखत पहिल्या डावात १३ धावांची अल्पशी आघाडी घेतली होती. विराट कोहलीने १६९ धावांची खेळी साकारून इंग्लंडच्या मोठय़ा आघाडीचे मनसुबे उधळून लावले होते. त्यानंतर हिंदुस्थानी गोलंदाजांनी इंग्लंडला दुसर्या डावात १८० धावांत गुंडाळून सामना आपल्या बाजूने फिरवला होता. हिंदुस्थानला अडीच दिवसांत विजयासाठी १९६ धावा करायच्या होत्या. मात्र तिसर्या दिवशी हिंदुस्थानची दुसर्या डावात ५ बाद ११० अशी स्थिती झाल्याने चौथ्या दिवशी सामन्याचा निकाल लागणार हे स्पष्ट झाले.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड पहिला डाव : २८७ धावा.
हिंदुस्थान पहिला डाव : २७६ धावा.
इंग्लंड दुसरा डाव : १८० धावा.
हिंदुस्थान दुसरा डाव : ५६.२ षटकांत १६२ धावा (विराट कोहली ५१, हार्दिक पांड्या ३१, बेन स्टोक्स ६०/६)
तो गेला अन् पराभव झाला!
कोहलीला साथ देणारा दिनेश कार्तिक शुक्रवारच्या धावसंख्येत २ धावांची भर घालून २० धावांवर बाद झाला. त्यानंतर कोहलीने आलेल्या हार्दिक पांड्याच्या साथीने सातव्या गड्यासाठी २९ धावांची भागीदारी करुन हिंदुस्थानच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. मात्र एका बाजूने किल्ला लढविणार्या कोहलीला बेन स्टोक्सने पायचीत करून इंग्लंडच्या मार्गातील मुख्य अडथळा दूर केला. कोहलीने ९३ चेंडूंच्या खेळीत चार चौकारांसह ५१ धावांची खेळी केली. मोहम्मद शमीलाही (०) स्टोक्सने याच षटकातील अखेरच्या चेंडूवर यष्टीमागे बेअरस्टोकरवी झेलबाद करून हिंदुस्थानला आठवा हादरा दिला. अदिल रशीदने इशांत शर्माला (११) पायचीत केले. मग ६१ चेंडूंत ६ चौकारांसह ३१ धावा करणार्या हार्दिक पांड्यानेही स्टोक्सच्या गोलंदाजीवर पहिल्या स्लिपमध्ये कुकला झेल दिला अन् ५६.२ षटकांत १६२ धावसंख्येवर ‘टीम इंडिया’चा दुसरा डाव संपुष्टात आला.



























































