
गुलाबी चेंडू आणि दिवस-रात्र कसोटीतही ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजीवर तूफानी हल्ला करत गॅबावरही त्यांची राखरांगोळी केली. चौथ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाने सलग दुसरी कसोटी जिंकत पुन्हा एकदा ऍशेस आपल्याकडे राखण्याच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. मिचेल स्टार्क आणि मायकेल नेसर या दोन शस्त्रांनी इंग्लंडच्या दोन्ही डावांची अक्षरशः चिरफाड केली. स्टार्कने सामन्यात एकूण 8 तर नवोदित नेसरने 6 विकेट्स घेत इंग्लंडला उभे राहूच दिले नाही. ऍशेसच्या पहिल्या दोन कसोटींत इंग्लंडच्या बॅझबॉलचा अक्षरशः चुराडा झाला आहे. सलग दोन पराभवानंतर खचलेल्या इंग्लंडला पुन्हा उभारी घेण्यासाठी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून भरारी घ्यावी लागणार आहे.
रूटचं शतक; पण संघ निराधारच
इंग्लंडच्या पहिल्या डावात ज्यो रूटने 138 धावांची झुंजार खेळी करत संघाला काहीसा सन्मान मिळवून दिला. 206 चेंडू, 15 चौकार आणि एक षटकार यांतून साकार झालेली ही खेळी दर्जेदार होती. मात्र रूटशिवाय कुणीही साथ न दिल्याने इंग्लंडचा डाव 334 धावांत आटोपला. स्टार्कच्या 6 विकेट्समुळे ऑस्ट्रेलियाने कसोटीवर प्रारंभीच पकड घट्ट केली.
ऑस्ट्रेलियाची जबरदस्त फलंदाजी
ऑस्ट्रेलियाने 511 धावांचा डोंगर उभा करताना त्यांच्या जेक वेदराल्ड (72), लाबुशेन (65), स्टीव्ह स्मिथ (61) आणि ऍलेक्स कॅरी (63) यांनी इंग्लिश गोलंदाजांना अक्षरशः हैराण केले. त्यातच स्टार्कने 141 चेंडूंत 77 धावांची झुंजार खेळी करत मी फक्त गोलंदाज नाही हा ठसा उमटवला. ब्रायडन कार्सने 4 विकेट्स घेतल्या खऱ्या, पण 152 धावा देत त्याच्यावरचा भार वाढवला.
दुसऱया डावातही इंग्लंडची अवस्था ‘जैसे थे’
दुसऱया डावातही इंग्लंड सावरला नाही. 241 धावांवर त्यांचा डाव संपला आणि सामनाही संपला. कर्णधार बेन स्टोक्सचे 50 आणि विल जॅक्सचे 41 धावा हा केवळ औपचारिक प्रतिकार ठरला. नेसरने 5 बळी घेत इंग्लंडच्या उरल्यासुरल्या आशाही धुऊन काढल्या.
65 धावा सहजच केल्या
ऑस्ट्रेलियाला विजयासाठी फक्त 65 धावा हव्या होत्या. ट्रव्हिस हेडने वेगवान 22 धावा काढल्या, तर स्टीव्ह स्मिथने अवघ्या 9 चेंडूंमध्ये 23 धावा ठोकत सामना संपवलाच. वेदराल्ड 17 वर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा डाव संपवायला फार वेळ लावला नाही. तसाच सामनाही फार लांबवला नाही.




























































