
‘क्रिकेटची पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱया लॉर्ड्सवर जो रूटच्या दमदार शतकाच्या जोरावर इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पाच विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत आता यजमान इंग्लंडकडे 1-0 अशी आघाडी झाली आहे.
दहा हजारी क्लबमध्ये स्थान मिळवणारा रूट दुसरा इंग्लंडवासी
कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा पल्ला पार करणारा इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज जो रूट ऍलिस्टर कूकनंतर दुसरा इंग्लिशवीर, तर जगातला 14 वा फलंदाज ठरला आहे. रविवारी न्यूझीलंडविरुद्ध आपले शतक झळकावताना रूटने कसोटी कारकीर्दीतील आपली एकूण धावसंख्या 10,015 धावांवर नेली आहे. त्याने 118 कसोटी आणि 218 डावांत 26 शतके व 53 अर्धशतके झळकावत कसोटीच्या ‘दस हजारी’ मनसबदारांत स्थान मिळवले आहे. रूट आणि कूक यांनी वयाच्या 31 व्या वर्षातच असा पराक्रम साकारला आहे.
पहिल्या डावामध्ये न्यूझीलंडची फलंदाजी अक्षरशः पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. अवघ्या 132 धावांमध्ये न्यूझीलंडचा डाव आटोपला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स ऍण्डरसन याने 16 षटकांमध्ये 66 धावा देत 4 फलंदाज वाद केले. तर मॅट पॉट्स याने 9.2 षटकांमध्ये अवघ्या 13 धावा देत 4 फलंदाज बाद केले. ऍण्डरसन आणि पॉट्स यांच्या भेदक माऱयापुढे न्यूझीलंडच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. इंग्लंडच्या फलंदाजांनादेखील पहिल्या डावामध्ये फारशी साजेशी कामगिरी करून दाखवता आली नाही. इंग्लंडचा डावदेखील 141 धावांमध्ये आटोपला. पहिल्या डावअखेर इंग्लंडकडे 9 धावांची आघाडी होती. इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॉली याच्या 43 धावांची खेळी वगळता इतर सर्व फलंदाज निष्प्रभ ठरले. न्यूझीलंडचा अनुभवी गोलंदाज टीम साऊदी याने 14 षटकांत 55 धावा देत 4 गडी बाद केले. ट्रेंट बोल्ट याने 3 गडी बाद करत साऊदीला उत्तम साथ दिली.
रूटने शतकी खेळीने विजयाची मुळे घट्ट केली
दुसऱया डावामध्ये डॅरल मिचेल याने ठोकलेल्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडला 285 धावांपर्यंत मजल मारता आली. मिचेलने 203 चेंडूंमध्ये 12 चौकारांच्या मदतीने 108 धावा केल्या. टॉम ब्लंडेल याने 198 चेंडूंमध्ये 96 धावा करत उत्तम साथ दिली. इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉड, मॅट पॉट्स यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या, तर ऍण्डरसनने 2 फलंदाज बाद केले. विजयासाठी न्यूझीलंडने दिलेल्या 276 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या दुसऱया डावाची सुरुवात खराब झाली. दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाल्यामुळे न्यूझीलंडने सामन्यावर पकड निर्माण केली होती. 46 धावांवर 3 गडी बाद झालेले असताना जो रूट याने इंग्लंडच्या डावाला आकार देण्यास सुरुवात केली. त्याने 170 चेंडूंमध्ये 12 चौकारांच्या मदतीने झळकावलेल्या 115 धावांच्या जोरावत इंग्लंडचा विजय सोपा झाला. बेन स्ट्रोक्स याने 110 चेंडूंत 54 धावा करत रूटला उत्तम साथ दिली.




























































