
हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा विकेट किपर आणि फलंदाज ऋषभ पंत याने खुलासा केला आहे की इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी जलद गती गोलंदाज मोहम्मद सिराजवर प्रेक्षकांनी चेंडू फेकला होता.
टीव्ही कॅमेऱ्यातून दाखवण्यात आलं होतं की हिंदुस्थानचा कर्णधार विराट कोहली सीमेजवळ क्षेत्ररक्षण करत असलेल्या मोहम्मद सिराज याला ती वस्तू बाहेर फेकण्यास सांगत होता. खेळ संपल्यानंतर पंतला विचारण्यात आल्यावर त्याने याचा खुलासा केला.
पंत म्हणाला, ‘(प्रेक्षकांमधून) कोणी तरी सिराजवर चेंडू फेकला होता. त्यामुळे कोहली नाराज होता. तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करायच्या असतील तर त्या व्यक्त करा. मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंवर अशा वस्तू वैगरे फेकू नका. असं वस्तू फेकणं हे क्रिकेट करता चांगलं नाही’, अशा शब्दात पंतने आपल्या भावना व्यक्त केल्या.
सिराज याने लॉर्ड्समध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावली होती. या गोलंदाजाला काही प्रेक्षकांनी सिडनीमध्ये खेळताना अपशब्द वापरले होते. या कारणास्तव काही प्रेक्षकांना बाहेर काढण्याची कारवाई देखील करण्यात आली होती.
लॉर्ड्स कसोटीवेळी देखील शँपेनच्या बाटलीचं झाकण फेकण्यात आले होते. त्यावेळी केएल राहुल तिथे फिल्डिंग करत होता. कोहलीने त्यावेळी देखील नाराजी व्यक्त केली होती.

























































